

शौर्याची राष्ट्रीय विक्रमाला ‘सुवर्ण’ झेप!
१०० मीटर अडथळा दौडीत १३.५९ सेकंदांची विक्रमी वेळ
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : ठाण्याच्या शौर्या अंबुरे हिने डकार २०२६ युवा ऑलिम्पिक स्पर्धेत वेग, कौशल्य आणि जिद्दीचा अप्रतिम संगम साधत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. महिलांच्या १०० मीटर अडथळा दौड स्पर्धेत १३.५९ सेकंदांची वेळ नोंदवत तिने कांस्यपदकावर नाव कोरले. विशेष म्हणजे, या झंझावाती कामगिरीसह १३.७० सेकंदांचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत शौर्याने नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.
अडथळ्यांवर मात करत वेगवान धाव घेणाऱ्या शौर्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उंचावण्यासोबतच ठाण्याच्या क्रीडा क्षेत्रालाही नवी ओळख मिळवून दिली. तिच्या या कामगिरीमुळे भारतीय मैदानी क्रीडा क्षेत्रात नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. कांस्यपदक आणि राष्ट्रीय विक्रम अशा दुहेरी यशाने शौर्याने आपल्या प्रतिभेची ठळक छाप उमटवली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी शौर्याचा विशेष सन्मान केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर ठाण्याचे नाव उंचावणाऱ्या शौर्याची मेहनत, सातत्य आणि जिद्द कौतुकास्पद असल्याचे सांगत महापौरांनी तिच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी शौर्याचे वडील तथा वरिष्ठ पोलिस अधिकारी अविनाश अंबुरे, आई रूपाली अंबुरे, प्रशिक्षक डॉ. अजित कुलकर्णी, अभिनेते मंगेश देसाई, छत्रपती पुरस्कारप्राप्त अद्वैता मांगले आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या हिमानी परब उपस्थित होते.
................................
कामगिरी एका नजरेत
स्पर्धा : डकार २०२६ युवा ऑलिम्पिक
प्रकार : महिला १०० मीटर अडथळा दौड
पदक : कांस्य
विक्रमी वेळ : १३.५९ सेकंद
जुना राष्ट्रीय विक्रम : १३.७० सेकंद
विक्रमातील सुधारणा : ०.११ सेकंद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.