गणेश नाईक भाजपचेच आहेत का? त्यांचा डीएनए चेक करायला हवा; आमदार मंदा म्हात्रेंचा घरचा अहेर

गणेश नाईक भाजपचेच आहेत का? त्यांचा डीएनए चेक करायला हवा; आमदार मंदा म्हात्रेंचा घरचा अहेर
Published on: 

गणेश नाईक भाजपचेच आहेत का?
त्यांचा डीएनए चेक करा : मंदा म्हात्रे
स्वपक्षीय मंत्रीच विकासकामांना विरोध करीत असल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ : नवी मुंबईतील भाजपच्या अंतर्गत राजकारणातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षाचे नेते तथा मंत्री गणेश नाईक यांच्यावर थेट टीका करीत ‘गणेश नाईक खरोखर भाजपचेच आहेत का, हे तपासण्यासाठी त्यांचा डीएनए चेक करायला हवा,’ असे वक्तव्य केले. भाजपच्या आमदारांनी सुचविलेल्या विकासकामांना स्वपक्षीय मंत्रीच विरोध करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
नवी मुंबईतील विकासकामांबाबत माहिती देण्यासाठी शुक्रवारी (ता. १३) आयोजित पत्रकार परिषदेत म्हात्रे बोलत होत्या. नवी मुंबईतील विकासकामे कशी होणार नाहीत, याचीच काळजी गणेश नाईक घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तेत असूनही विविध विकासकामांना स्वपक्षातूनच विरोध होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
नेरूळ येथील बहुविशेषज्ञ रुग्णालय आणि महाविद्यालय प्रकल्पाला विरोध करण्यात आल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला. संबंधित जागेवरील क्रिकेटप्रेमींना पुढे करून या प्रकल्पाला विरोध केला जात असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच सीबीडी बेलापूर येथील त्यांच्या महत्त्वाकांक्षी मरीना प्रकल्पालाही अडथळे निर्माण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. म्हात्रे यांच्या या वक्तव्यामुळे नवी मुंबईतील भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, मंत्री गणेश नाईक यांच्याकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

तुम्हाला पाडूनच मी निवडून आले!
प्रशासकीय कार्यपद्धतीबाबत बोलताना आपण कधीही आयुक्त किंवा अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली नसल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाने आपल्या पदाचा आणि अधिकारांचा योग्य वापर करावा तसेच जनतेच्या संयमाचा अंत पाहू नये, असेही त्या म्हणाल्या.
गणेश नाईक यांना उद्देशून त्या म्हणाल्या, ‘मी तुमच्या आधीपासून भाजपची आमदार आहे आणि तुम्हाला पराभूत करूनच निवडून आले आहे.’ आपण सरकारकडून विविध विकासकामे मंजूर करून आणत असून, मुख्यमंत्र्यांनी नुकताच २० कोटी रुपयांचा निधी दिल्याचेही त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.