

पोलिसाला फरपटत नेल्याप्रकरणी
गुन्हा दाखल करण्यास विलंब
नवीन पनवेल, ता. १४ (बातमीदार) : कळंबोली परिसरात नाकाबंदीदरम्यान एका कारने धडक दिल्यानंतर पोलिस हवालदाराला सुमारे २०० मीटर बोनेटवरून फरपटत नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याने कळंबोली पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. या घटनेनंतर तीन दिवस उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याची दखल घेत नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ही कारवाई केली.
कळंबोली परिसरात ८ नोव्हेंबरला रात्री पावणेदोनच्या सुमारास नाकाबंदी सुरू असताना पोलिसांनी एका चारचाकी कारला थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने कार न थांबवता समोर उभे असलेले पोलिस हवालदार दिलीप हिरामण भोई (वय ४२, रा. कोपरखैरणे) यांना धडक दिली. धडकेनंतर भोई कारच्या बोनेटवर फेकले गेले. त्यानंतरही चालकाने कार न थांबवता त्यांना सुमारे २०० मीटरपर्यंत फरपटत नेल्याचे समोर आले आहे. या घटनेत भोई गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेनंतर चालकासह कारमधील दोघे जण वाहनासह पसार झाले. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान, एवढी गंभीर घटना घडूनही तीन दिवस गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेत तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारनवर यांची उचलबांगडी केली असून, पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.