नदीपात्रातील छटपूजेवरून वाद पेटला; आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पोलिसांची मनसेला नोटीस!

नदीपात्रातील छटपूजेवरून वाद पेटला; आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पोलिसांची मनसेला नोटीस!
Published on: 

नदीपात्रातील छठपूजेवरून वाद पेटला
आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पोलिसांची मनसेला नोटीस!
तरीही छटपूजेच्या विरोधात ॲक्शन मोडमध्ये राहणार; मनसेने स्पष्ट केली भूमिका!


बदलापूर, ता. १४ (बातमीदार) ः उल्हास नदीपात्रात होणाऱ्या छठपूजेवरून बदलापुरातील वातावरण चांगलेच तापले आहे. छठपूजेच्या आयोजनाला मनसेने विरोध दर्शविल्यानंतर पोलिसांनी मनसेचे शहराध्यक्ष निशांत मांडवीकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस मिळाल्यानंतरही मनसेने आपली आक्रमक भूमिका कायम ठेवली असून, छठपूजेच्या विरोधात आम्ही ॲक्शन मोडमध्ये राहणार आहोत, अशी स्पष्ट भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे छठपूजेच्या दिवशी मनसे नेमकी काय भूमिका घेणार, याबाबत शहरात उत्सुकता निर्माण झाली आहे.
पोलिसांनी आम्हाला नोटीस बजावली आहे. मात्र, ही नोटीस राजकीय दबावामुळे बजावली आहे. आम्ही राज ठाकरे यांचे मनसैनिक आहोत. त्यामुळे मनसे स्टाईलनेच छठपूजेच्या विरोधात ॲक्शन मोडमध्ये असणार आहोत. आमची भूमिका काय असेल, हे उद्या छठपूजेच्या वेळी दिसेलच, असा इशारा शहराध्यक्ष निशांत मांडवीकर यांनी दिला आहे. छठपूजेदरम्यान आक्षेपार्ह घोषणा, बॅनर, पोस्टर्स लावू नयेत तसेच कोणतेही बेकायदा कृत्य करू नये आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह संदेश प्रसारित करू नयेत, अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी नोटिशीद्वारे दिल्या आहेत. आदेशाचा भंग केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
मनसेचा विरोध कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला नसून, सार्वजनिक ठिकाणी समाजाची ताकद दाखवण्यासाठी आणि मराठी माणसाला डिवचण्यासाठी अशा प्रकारचे आयोजन केले जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, शहरातील सत्ताधारी भाजपच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे आणि नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांच्या प्रभागात उत्तर भारतीय आणि बिहारी नागरिकांची संख्या मोठी असल्याने मतांच्या राजकारणातून या कार्यक्रमाला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोपही मांडवीकर यांनी केला आहे.
----------------
दगड-मातीचा त्रास होऊ नये, यासाठी मातीचा भराव
उल्हास नदीच्या काठावरील मातीच्या भरावावरूनही मनसेने नगराध्यक्षांच्या भूमिकेला लक्ष्य केले आहे. उत्तर भारतीय भाविकांना पूजेदरम्यान नदीकाठावरील दगड-मातीचा त्रास होऊ नये, यासाठी मातीचा भराव टाकण्यात आल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी दिली होती. या भूमिकेचा समाचार घेताना गणेशोत्सवात भाविक याच नदीकाठावरून गणेशमूर्ती विसर्जनासाठी नेतात; मात्र त्या वेळी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली जाते आणि मराठी माणूसही त्याला सहकार्य करतो. मग छठपूजेसाठीच नदीकाठावर मातीचा भराव टाकण्याची आणि प्रशासनाचा खर्च करण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या आरोपांवर नगर परिषद आणि महसूल विभाग काय भूमिका घेतात तसेच पोलिसांच्या नोटीसनंतर मनसे प्रत्यक्षात कोणती भूमिका घेते, याकडे बदलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.