

आलिशान बस स्थानकात सुविधांचा अभाव
पाणी, स्वच्छतागृहांची दुरवस्था; एसटी-बेस्टचे नियंत्रण कक्ष बंद
कोपरखैरणे, ता. १५ (बातमीदार) : प्रवाशांना आधुनिक आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने वाशीतील जुन्या बस डेपोच्या जागेवर आलिशान बस स्थानक उभारण्यात आले, मात्र देखभालीअभावी या बस स्थानकातील सुविधांचा बोजवारा उडाला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांची पायपीट, अस्वच्छ स्वच्छतागृहे, वापराविना पडून असलेले एसटी आणि बेस्टचे नियंत्रण कक्ष यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या मोफत बसपास केंद्रातही बसण्याची व्यवस्था नसल्याने त्यांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.
नवी मुंबई महापालिकेने बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर वाशीतील जुन्या बस डेपोच्या जागेत बस स्थानकासह व्यापारी संकुल उभारले आहे. या बस स्थानकात प्रवाशांसाठी आधुनिक बस निवारा शेड, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा यांसह विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, मात्र नियमित देखभाल आणि व्यवस्थापनाच्या अभावामुळे या सुविधांचा उद्देशच हरवल्याचे चित्र आहे.
बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी सुमारे १०० मीटर अंतरावरील पाण्याच्या कूलरपर्यंत जावे लागते. त्यातच कूलरच्या परिसरात अस्वच्छता असून, सतत पाणी साचलेले असते. त्यामुळे पाण्याची सुविधा उपलब्ध असूनही प्रवाशांना तिचा सहज वापर करता येत नाही.
चौकट
स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय
प्रवाशांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृहे आणि मुताऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र नियमित स्वच्छता होत नसल्याने त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. पुरुषांच्या स्वच्छतागृहातील एका मुतारीचे भांडेही गायब आहे. परिसरातील बेघर व्यक्तींकडून या स्वच्छतागृहांचा अधिक वापर होत असल्याचे सांगितले जाते. संबंधित कर्मचाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने अस्वच्छतेत भर पडत आहे. बस स्थानकातील एका वाहकानेही या परिस्थितीला दुजोरा दिला.
प्रवाशांची फरपट
बस स्थानकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि बेस्टचे स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत, मात्र संबंधित प्रशासनांनी अद्याप या कक्षांचा ताबा घेऊन ते सुरू केलेले नाहीत. त्यामुळे एसटी बसचे आरक्षण करण्यासाठी प्रवाशांना वाशी महामार्ग परिसरातील आरक्षण केंद्र गाठावे लागते, तर बेस्टचे पास मिळवण्यासाठी प्रवासी आणि विद्यार्थ्यांना बस डेपोबाहेरील स्टॉलवर अवलंबून राहावे लागत आहे.
ज्येष्ठ नागरिकांनाही उभे राहण्याची वेळ
बस स्थानकातील एनएमएमटीच्या नियंत्रण कक्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत बसपास केंद्र सुरू आहे, मात्र पास काढण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना रांगेत उभे राहावे लागते. त्यांच्यासाठी बसण्याची साधी व्यवस्था नसल्याने वयोवृद्ध प्रवाशांची गैरसोय होत आहे. एकीकडे कोट्यवधींचे आधुनिक बस स्थानक उभारून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचा दावा केला जात असताना, दुसरीकडे त्यांची देखभाल आणि वापराकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे केवळ आलिशान इमारत उभारून उपयोग नसून, उपलब्ध सुविधांची नियमित देखभाल आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
कोट
वाशी बस स्थानकातील असुविधांबाबत संबंधित प्रशासकीय यंत्रणेला सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच, सुविधांच्या देखभालीत सातत्य राखले जाईल.
- विकास झंझाड, परिवहन समिती सभापती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.