ग्रामीण तरुणांना रोजगारनिर्मितीची संधी

ग्रामीण तरुणांना रोजगारनिर्मितीची संधी
Published on: 

कल्याण, ता. १५ (वार्ताहर) : शेती करायची, नोकरीच्या मागे धावायचे की स्वतःचा व्यवसाय उभा करायचा, या प्रश्नांशी झगडणाऱ्या ग्रामीण तरुणांना रोजगाराची नवी दिशा देण्यासाठी शहापूर तालुक्यातील पिवळी येथे ६ डिसेंबरला मानसिक परिवर्तन कार्यशाळा होणार आहे. कृषी शिक्षण घेतलेल्या तरुणांच्या ज्ञानाला प्रत्यक्ष रोजगाराची जोड देतानाच त्यांना नोकरी मागणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे बनविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती प्रकल्पाच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यशाळेत ठाणे जिल्ह्यातील कृषी पदवीधर आणि पदविकाधारक तरुणांसह दहावी व बारावी उत्तीर्ण युवकांनाही सहभागी होता येणार आहे. मात्र, केवळ ६० प्रशिक्षणार्थींनाच प्रवेश दिला जाणार असून, त्यासाठी एक हजार रुपये नोंदणी शुल्क निश्चित करण्यात आले आहे. भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती २७ डिसेंबरला साजरी केली जाते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस राज्य शासनाकडून कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, वन, फलोद्यान आणि जैविक शेती अशा विविध शाखांमध्ये शिक्षण घेतलेल्या युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

नैसर्गिक शेती ही केवळ पिके घेण्याची पद्धत नसून, त्यातून रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, हा विचार तरुणांपर्यंत पोहोचविण्यावर कार्यशाळेत भर दिला जाणार आहे. तत्कालीन राज्यपाल आचार्य देवव्रत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून युवकांना रोजगारक्षम बनविण्याच्या संकल्पनेला प्रोत्साहन दिले आहे.

‘कमवा आणि शिका’तून रोजगाराची वाट
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वज्ञानाचा आधार घेत शहापूर तालुक्यातील पिवळी येथील माहूली गड कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या वर्षापासून डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक कृषी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी १९५० मध्ये स्थापन केलेल्या संस्थेच्या विचारधारेतून हा उपक्रम पुढे नेला जात आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि छत्रपती शिवाजी महाराज लोक विद्यापीठ यांच्या समन्वयातून ग्रामीण युवकांना रोजगाराभिमुख करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

पाच तालुक्यांतील युवकांना संधी
कल्याण, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड आणि भिवंडी या तालुक्यांतील इच्छुक युवकांना कार्यशाळेत सहभागी होता येणार आहे. कृषी क्षेत्रातील पदवी किंवा पदविका नसली, तरी दहावी अथवा बारावी उत्तीर्ण तरुणांसाठीही प्रवेश खुला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण पूर्ण केलेल्या युवकांनाही या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
इच्छुकांनी नोंदणीपूर्वी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून आत्मा संस्थेची कार्यपद्धती आणि मराठीतील मार्गदर्शक सूचना समजून घ्याव्यात, असे आयोजकांनी कळविले आहे. या कार्यशाळेनंतर अमरावती, अकोला, नाशिक, रायगड, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील विविध भागांतही टप्प्याटप्प्याने अशा कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत.

नोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन
कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवकांनी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती प्रकल्प, पिवळीचे अध्यक्ष प्रा. मधुकरराव देशमुख किंवा महासंचालक डॉ. मंगेश देशमुख यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.