मंत्री डॉ. धनसिंह रावत यांची भाजपा कळंबोली कार्यालयाला भेट

मंत्री डॉ. धनसिंह रावत यांची भाजपा कळंबोली कार्यालयाला भेट
Published on: 

सहकाराच्या अनुभवांची महाराष्ट्र-उत्तराखंडमध्ये देवाणघेवाण
डॉ. धनसिंह रावत यांच्यांकडून कुलस्वामीच्या कामकाजाची पाहणी
जुईनगर, ता. १५ (बातमीदार) : महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले उत्तराखंडचे सहकारमंत्री डॉ. धनसिंह रावत यांनी नवी मुंबईतील श्री कुलस्वामी को-ऑप. क्रेडिट सोसायटीला भेट देऊन संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली. महाराष्ट्रातील अग्रगण्य नागरी सहकारी पतसंस्थांमधून या संस्थेची अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. महाराष्ट्राचे सहकारमंत्री, सहकार विभाग पुणे, सहकार आयुक्त आणि ठाणे जिल्हा उपनिबंधक यांच्या माध्यमातून ही निवड करण्यात आली.

संस्थेच्या प्रशासकीय कार्यालयात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र आणि उत्तराखंडमधील सहकार क्षेत्राची कार्यपद्धती, सहकार कायद्यांतील तरतुदी, शेतकऱ्यांसाठीच्या योजना आणि सहकारी संस्थांसमोरील आव्हाने यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी उपनिबंधक, सहकारी संस्था सर्जेराव कांदळकर उपस्थित होते.

या बैठकीला संस्थेचे उपाध्यक्ष तथा आमदार शरद सोनवणे, नवी मुंबई बँकेचे अध्यक्ष बी. आर. सावंत, उत्तराखंडचे उद्योजक डॉ. के. एन. पनवार, सी. ए. सुशांत आलमे, संस्थेचे सल्लागार राजन करकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत चव्हाण, महाव्यवस्थापक किशोर मोरे, उपमहाव्यवस्थापक बाळासाहेब चव्हाण, पंढरीनाथ चव्हाण, रवींद्र ताजणे, सतीश शिंदे, सतीश सांडभोर, विभागीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील कार्याची दखल म्हणून श्री कुलस्वामी को-ऑप. क्रेडिट सोसायटीची अभ्यास दौऱ्यासाठी झालेली निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या भेटीमुळे दोन्ही राज्यांतील सहकारी संस्थांच्या कार्यपद्धती, कायदे आणि अनुभवांची देवाणघेवाण होऊन परस्पर सहकार्याला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.


सहकार कायद्यांतील तरतुदींवर चर्चा
महाराष्ट्र आणि उत्तराखंड राज्यांच्या सहकार कायद्यांमधील विविध तरतुदी, त्यांची अंमलबजावणी, सहकारी संस्थांच्या कामकाजातील अडचणी आणि त्यावरील संभाव्य उपाययोजनांबाबत विचारविनिमय करण्यात आला. दोन्ही राज्यांतील सहकार क्षेत्रातील अनुभवांची देवाणघेवाण हा या अभ्यास दौऱ्याचा प्रमुख उद्देश होता.

शेतकऱ्यांसाठीच्या योजनांची माहिती
उत्तराखंडमध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सहकार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना आणि सवलतींची माहिती डॉ. रावत यांनी दिली. सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांवरही त्यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.