गव्हाण-वडघर जिल्हा परिषद गटांच्या महापालिका समावेशाला विरोध

गव्हाण-वडघर जिल्हा परिषद गटांच्या महापालिका समावेशाला विरोध
Published on: 

गव्हाण-वडघरच्या हद्दवाढीला विरोध
१८ नोव्हेंबरला ‘गेट बंद’ आंदोलन

पनवेल, ता. १५ (बातमीदार) : गव्हाण आणि वडघर जिल्हा परिषद गटांचा पनवेल महापालिकेत समावेश करण्याच्या प्रस्तावाविरोधात १८ नोव्हेंबर रोजी महापालिका मुख्यालयासमोर ‘गेट बंद’ आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत अजित कृष्णा म्हात्रे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पनवेल महापालिकेच्या हद्दवाढीच्या दृष्टीने गव्हाण आणि वडघर हे दोन जिल्हा परिषद गट महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्याचा ठराव विशेष महासभेत मंजूर करण्यात आला आहे. या परिसराचे नियोजन प्राधिकरण सिडकोकडेच कायम ठेवून हद्दवाढ करण्याच्या प्रस्तावाला महासभेने मान्यता दिली आहे. मात्र, या निर्णयामुळे ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींचे स्वतंत्र अस्तित्व आणि स्वायत्तता धोक्यात येण्याची शक्यता असल्याचा दावा म्हात्रे यांनी केला आहे.

पनवेलचे आमदार महेश बालदी यांनी या दोन्ही जिल्हा परिषद गटांचा महापालिकेत समावेश करण्याबाबत प्रशासनाला पत्र दिले आहे, मात्र या मागणीला म्हात्रे यांनी विरोध दर्शविला आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकार कायम राहणे आवश्यक आहे. महापालिकेत समावेश झाल्यास ग्रामपंचायतींचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येऊन स्थानिक नागरिकांच्या हितावर परिणाम होऊ शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

प्रशासनाने या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करून समावेशाचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून महापालिका मुख्यालयासमोर ‘गेट बंद’ आंदोलन छेडण्यात येईल, असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.

आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी शासन आणि महापालिका प्रशासनाची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, कोकण विभागीय आयुक्त, महापौर, पोलिस आयुक्त, पनवेल तहसीलदार आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत. या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संबंधित ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.