

वर्षभरापासून साईनाथ रोडवर गटाराचे घाण पाणी
दुर्गंधीमुळे नागरिक, दुकानदार हैराण; पालिकेच्या पी-पश्चिम विभागाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष
मालाड, ता. १५ (बातमीदार) : मालाड पश्चिम येथील वर्दळीच्या साईनाथ रोडवर गेल्या वर्षभरापासून गटाराचे घाण पाणी रस्त्यावर साचत असल्याने नागरिक, दुकानदार आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली असून, पादचाऱ्यांना त्यातूनच वाट काढावी लागत आहे. याबाबत पालिकेच्या पी-पश्चिम विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या सुटलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
साईनाथ रोडलगत साईनाथ मंडई असून, मालाड रेल्वे स्थानकात ये-जा करणारे प्रवासी, ग्राहक आणि वाहनचालकांची या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. परिसरात बेस्ट बस थांबा, रिक्षा आणि शेअर टॅक्सी स्थानक असल्याने दिवसभर नागरिकांची ये-जा सुरू असते, मात्र गटारे तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर साचत आहे. या पाण्यातून मार्ग काढताना पादचाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तसेच दुचाकी आणि इतर वाहनांमुळे हे पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर आणि कपड्यांवर उडत असल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
या समस्येबाबत विविध संस्था, संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेच्या पी-पश्चिम विभागाकडे तसेच ऑनलाइन माध्यमातून तक्रारी केल्या आहेत, मात्र गटारांची नियमित साफसफाई होत नसल्याचा आरोप स्थानिक दुकानदार आणि नागरिकांनी केला आहे. वर्षभरापासून समस्या कायम असल्याने दुकानदारांसह प्रवाशांनाही याचा फटका बसत आहे. पालिकेने या समस्येची तातडीने दखल घेऊन गटारांची साफसफाई करावी, साचलेल्या पाण्याचा निचरा करावा आणि परिसरात औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिक, दुकानदार आणि प्रवाशांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.