

फेरीवाला धोरण कागदावरच!
पदपथांवर अतिक्रमण; पादचारी, विक्रेते हॉकर्स झोनच्या प्रतीक्षेत
वसई, ता. १५ (बातमीदार) : शहरातील वाढती वाहतूक कोंडी, पदपथांवरील अतिक्रमण आणि बेशिस्त फेरीवाल्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वसई-विरार महापालिकेने आखलेले फेरीवाला धोरण अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे. फेरीवाला समितीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली, विक्रेत्यांसाठी स्वतंत्र हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले आणि नऊ प्रभागांमध्ये नियोजनाचा आराखडाही तयार झाला. मात्र, हरकतींनंतर पुढील प्रक्रिया ठप्प झाल्याने संपूर्ण धोरणाचा उद्देशच बाजूला पडला आहे. परिणामी शहरातील प्रमुख रस्ते, रेल्वे स्थानक परिसर आणि बाजारपेठांमधील पदपथांना फेरीवाल्यांचा विळखा कायम असून, पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे.
वसई-विरार शहराची लोकसंख्या आणि नागरी विस्तार झपाट्याने वाढत असताना सार्वजनिक जागांचे नियोजन हा महापालिकेसमोरील महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. शहरात १५ हजार २०० हून अधिक पथविक्रेत्यांची नोंद असून, त्यांच्या व्यवसायासाठी शिस्तबद्ध व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने फेरीवाला धोरण तयार करण्यात आले. या धोरणानुसार विक्रेत्यांचे सर्वेक्षण, नोंदणी, वर्गीकरण आणि स्वतंत्र विक्री क्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, प्रशासकीय पातळीवरील पुढील निर्णय रखडल्याने नियोजनाचा प्रत्यक्ष फायदा नागरिकांना किंवा विक्रेत्यांना मिळू शकलेला नाही.
वसई, विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात सकाळपासून रात्रीपर्यंत प्रवाशांची मोठी वर्दळ असते. याच परिसरातील पदपथांवर फळे, भाजीपाला, कपडे, खाद्यपदार्थ आणि विविध वस्तूंचे विक्रेते ठाण मांडून बसतात. बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांलगतही हातगाड्या व तात्पुरती दुकाने वाढली आहेत. परिणामी पादचाऱ्यांसाठी असलेले पदपथच व्यवसायाच्या जागा बनले आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि दिव्यांगांना सुरक्षित चालणेही कठीण झाले आहे. पदपथ उपलब्ध नसल्याने नागरिकांना थेट वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढावा लागत आहे.
चौकट : धोरण आहे, अंमलबजावणी कुठे?
फेरीवाला धोरण निश्चित झाल्यानंतर फेरीवाल्यांना हक्काची जागा मिळेल आणि नागरिकांना मोकळे पदपथ उपलब्ध होतील, अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, हरकतींमुळे पुढील प्रक्रिया ठप्प झाली आहे. प्रशासनाने अद्याप आवश्यक कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करून फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे.
- पंकज देशमुख, नगरसेवक, वसई-विरार महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.