

मुरबाड, ता. १५ (वार्ताहर) : तालुक्यातील शिरोशी ग्रामपंचायतीच्या कारभारात कथित आर्थिक अनियमितता आणि प्रशासकीय गैरव्यवहार झाल्याचा दावा करत उपसरपंच शेखर देशमुख यांनी सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याची तक्रार त्यांनी केली असून, १७ नोव्हेंबरपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
देशमुख यांच्या तक्रारीनुसार, ग्रामपंचायतीच्या १५व्या वित्त आयोगाचा निधी, ग्रामनिधी आणि अन्य शासकीय निधीच्या वापरात अनियमितता झाली आहे. डिसेंबर २०२५ ते मे २०२६ या कालावधीत मासिक सभा किंवा ग्रामसभेचे ठराव; तसेच सदस्यांना विश्वासात न घेता निधी काढण्यात आला आहे. याशिवाय घरपट्टी वसुलीची रक्कम बँकेत जमा न करणे, ग्रामसभा आयोजित न करणे, गटविकास अधिकाऱ्यांच्या चौकशी आदेशानंतरही सरपंच व ग्रामसेवक अनुपस्थित राहणे; सरपंच महिलेच्या पतीचा ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या बँक खात्यातून सरपंचांच्या पतीच्या नावाने धनादेशाद्वारे रक्कम काढण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.
या सर्व व्यवहारांची सखोल आर्थिक व प्रशासकीय चौकशी करून संबंधितांवर निलंबनासह कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. यापूर्वी १५ जुलै, ७ सप्टेंबर, १ ऑक्टोबर आणि २ नोव्हेंबरला संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याचे त्यांनी सांगितले. पुरावे सादर करूनही कारवाई झाली नाही. गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुरबाड यांनी ३ जुलैला दिलेल्या अहवालात ग्रामपंचायत कायदा आणि लेखासंहितेतील विविध नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद असल्याचा दावाही तक्रारदारांनी केला आहे.
मंगळवारपासून उपोषणाचा इशारा
प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने १७ नोव्हेंबरपासून शिरोशी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्धार देशमुख यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भातील निवेदन मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, ग्रामविकास विभागाचे सचिव, कोकण विभागीय आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी, मुरबाडचे आमदार किसन कथोरे आणि पोलिस प्रशासनाला पाठविण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.