

जंजिऱ्यावर पर्यटकांची गर्दी
दिवाळी सुट्टीत किनारपट्टीला पसंती; ऐतिहासिक वारसा समजण्यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शक नेमण्याची गरज
मुरूड, ता. १५ (बातमीदार) : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मुरूड-जंजिरा, काशीद बीच, दिवेआगर अशा पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. विशेषतः ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर शनिवारपासून पर्यटकांची अलोट गर्दी होत आहे. मुंबई, उपनगरांसह पुणे, कोल्हापूर, नाशिक अशा भागांतून पर्यटक किल्ला पाहण्यासाठी दाखल होत आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी बोटींची व्यवस्था करण्यात आली असली, तरी पर्यटकांना ऐतिहासिक वास्तूंची माहिती देण्यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शक उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.
राजपुरी जेट्टी, दिघी जेट्टी तसेच खोरा बंदरातून शिडाच्या होड्या आणि इंजिन बोटींद्वारे पर्यटकांची वाहतूक सुरू आहे. किल्ल्याच्या मागील बाजूस स्वतंत्र जेट्टी उभारण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांना किल्ल्यात प्रवेश करणे अधिक सुलभ व सुरक्षित झाले आहे. मात्र, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रवासी वाहतूक करण्याचे निर्देश असतानाही सकाळी नऊ वाजल्याशिवाय बुकिंग होत नसल्याची तक्रार काही पर्यटकांनी केली आहे.
दरम्यान, पुरातत्त्व विभागाकडून किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ प्रत्येक पर्यटकाकडून २५ रुपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे. बोटीचे भाडे स्वतंत्रपणे द्यावे लागते.
इतिहासाची माहिती मिळण्याची गरज
जंजिरा किल्ल्यातील राजमहाल, दरबार, मंदिर, मशीद, नगारखाना, शस्त्रागार, भुयारी मार्ग तसेच बुरुजांवरील कलालबांगडीसारख्या अवजड तोफांचे ऐतिहासिक महत्त्व पर्यटकांना समजावे, यासाठी प्रशिक्षित मार्गदर्शक नेमणे आवश्यक आहे. सुमारे २२ एकर परिसर असलेल्या किल्ल्याची परिक्रमा पर्यटकांना साधारण पाऊण तासात पूर्ण करावी लागते. मार्गदर्शक नसल्याने किल्ल्याचा ३५० वर्षांचा इतिहास आणि तो अजिंक्य व अभेद्य का राहिला, याबाबतची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचत नाही.
कोल्हापूर येथील पर्यटक जनगोंडा पाटील यांनी पर्यटन व्यवसायातून स्थानिकांना शाश्वत रोजगार मिळू शकतो, असे मत व्यक्त केले. तसेच पुरातत्त्व विभागाने किल्ल्याची आवश्यक डागडुजी करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.