

ठाणे जिल्ह्यातील कोतवाल
भरतीचे वेळापत्रक बदलले
सहा तालुक्यांतील उमेदवारांना आणखी दोन महिन्यांची प्रतीक्षा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : ठाणे जिल्ह्यातील महसूल सेवक (कोतवाल) पदांसाठी १५ नोव्हेंबर रोजी होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार भरती प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले असून, आता १७ जानेवारी २०२७ रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना आणखी दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत ठाणे, कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, भिवंडी आणि शहापूर या सहा तालुक्यांतील रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महसूल सेवक निवड समितीचे अध्यक्ष तथा उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांनी सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
नवीन वेळापत्रकानुसार, २३ ते ३० नोव्हेंबरदरम्यान तालुकानिहाय रिक्त पदांची यादी तयार केली जाणार आहे. त्यानंतर १ ते १५ डिसेंबरदरम्यान बिंदुनामावली निश्चित केली जाईल. १६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असून, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अर्जांची छाननी केली जाईल.
उमेदवारांना ८ जानेवारीपासून प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. १७ जानेवारीला लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर उत्तरसूची व निकाल जाहीर करून कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. २७ जानेवारी रोजी निवड झालेल्या उमेदवारांना अंतिम नियुक्तिपत्रे देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उमेदवारांनी भरती प्रक्रियेतील बदलांची नोंद घ्यावी आणि पुढील सूचनांसाठी अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सुधारित वेळापत्रक
- लेखी परीक्षा : १७ जानेवारी २०२७
- उत्तरसूची व निकाल : १८ जानेवारी २०२७
- कागदपत्र पडताळणी : १८ ते २४ जानेवारी २०२७
- अंतिम नियुक्तीपत्र : २७ जानेवारी २०२७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.