

बालचित्रपटांना सरकार प्रोत्साहन देईल!
आशीष शेलार यांचे ‘चित्रपताका’त उद्गार
मुंबई, ता. १५ : ‘‘मराठी चित्रपटसृष्टीत बालचित्रपट अधिक सक्षम आणि चांगले बनायला हवेत. त्याकरिता राज्य सरकार प्रोत्साहन देईल,’’ असे उद्गार सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी काढले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘चित्रपताका-२०२६’ या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाला आज (ता. १५) उत्साहात सुरुवात झाली. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात आयोजित या चार दिवसांच्या महोत्सवाचे उद्घाटन आशीष शेलार यांच्या हस्ते झाले. या वेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सांस्कृतिक सचिव डॉ. किरण कुलकर्णी, दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील आणि निर्माते किरण शांताराम यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मान्यवर उपस्थित होते.
शेलार म्हणाले, ‘‘आजच्या लहान मित्रांना आपण आकर्षित करू शकलो, त्यांना व्यासपीठ देऊ शकलो आणि त्यांना जे आवडेल अशा विषयांची गोडी लावू शकलो, तर ते महत्त्वाचे आहे. त्यासाठी बालचित्रपटांवर काही योजना करण्याची गरज आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने यासाठी पुढाकार घ्यावा. मराठीतील बालचित्रपटांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आखून त्यावर काम करण्याची आवश्यकता आहे.’’ या वेळी मराठी चित्रपटांच्या भवितव्याबाबत बोलताना शेलार यांनी ओटीटीवरील मराठी चित्रपटांचे स्थान, चित्रपटगृहांची उपलब्धता आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रपटनिर्मितीला चालना देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, दादासाहेब फाळके आणि व्ही. शांताराम यांच्यासारख्या दिग्गजांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी नव्या पिढीला चित्रपटांकडे आकर्षित करणे आणि मराठी चित्रपटसृष्टीला तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सक्षम करणे आवश्यक असल्याचे शेलार यांनी या वेळी नमूद केले. महोत्सवाची सुरुवात नितीन सुपेकर दिग्दर्शित आणि उपेंद्र लिमये व जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘बंधू’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने झाली.
...
स्वतंत्र चित्रपटगृहे
मराठी चित्रपटांना स्वतंत्र व्यासपीठ मिळावे, यासाठी मुंबईत मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र चित्रपटगृहे उभारण्याचा शासनाचा मानस असल्याचे शेलार यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मुंबईतील बेस्टच्या जागांच्या वाणिज्यिक विकासामध्ये मराठी चित्रपटगृहांसाठी जागा राखून ठेवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या वर्षात या कामाची पायाभरणी होईल, तर पुढील तीन वर्षांत ही चित्रपटगृहे उभारण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.