

भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मुरबाड तालुक्यात ‘जनजाती गौरव दिन सप्ताह’ उत्साहात साजरा!
११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन; १८ नोव्हेंबर रोजी शासकीय योजनांचे शिबिर व विविध दाखल्यांचे वाटप
मुरबाड ता. १६ (वार्ताहर) ः आदिवासी समाजाचे महान क्रांतिकारक, स्वातंत्र्यसेनानी आणि जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मुरबाड तालुक्यात ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत ‘जनजाती गौरव दिन सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने या सप्ताहानिमित्त विविध गावांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि अन्यायाविरुद्ध केलेला संघर्ष आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा, आदिवासी बांधवांना शासकीय योजनांची माहिती मिळावी आणि समाजामध्ये जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने हा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.
या सप्ताहाची सुरुवात ११ नोव्हेंबरपासून विविध गावांना भेटी देऊन आणि जनजागृती अभियान राबवून करण्यात आली. १२ नोव्हेंबर रोजी झाडगाव येथील चौकाचे नामकरण करण्यात आले. तसेच परिसरात स्वच्छता अभियान राबवून सामाजिक स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. १३ नोव्हेंबर रोजी निर्दी येथील आल्याची वाडी येथे शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. या वेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते.
१५ नोव्हेंबर रोजी मोरोशी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली असून, मोरोशी समाजमंदिर येथे आदिवासी पारंपरिक नृत्य, आदिवासी चळवळीवरील गीतगायन तसेच विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून आदिवासी संस्कृती, परंपरा, कला आणि लोकजीवनाचे दर्शन घडविण्यात येणार आहे.
तसेच १६ व १७ नोव्हेंबर रोजी विविध शासकीय योजनांचा लाभ आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय विभागांच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
या सप्ताहाचा समारोप १८ नोव्हेंबर रोजी होणार असून, त्यानिमित्त विविध शासकीय दाखल्यांचे वाटप करण्यासाठी विशेष शासकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी बांधवांना शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत आणि आवश्यक दाखले व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे.
याबाबत माहिती देताना ठाणे जिल्हा अध्यक्ष गोविंद भला यांनी सांगितले की, भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, आदिवासी समाजाला त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, या हेतूने जनजाती गौरव दिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक पवार, अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोकजी इरनक, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या नंदाताई उघडा, विठ्ठल भांगरे, भाजपचे ज्येष्ठ नेते सुहास मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर, रमेश उघडा यांनीही या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
१५ नोव्हेंबर रोजी मोरोशी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या पारंपरिक आदिवासी नृत्य, गीतगायन आणि विविध कलांच्या सादरीकरणाला आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. तसेच १८ नोव्हेंबर रोजी आयोजित शासकीय शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन ठाणे जिल्हा अध्यक्ष गोविंद भला यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.