परतीच्या प्रवासात नियोजनाचा अभाव

परतीच्या प्रवासात नियोजनाचा अभाव
Published on: 

परतीच्या प्रवासात नियोजनाचा अभाव
मांडवा बंदरातील जलवाहतूक हाउसफुल; एसटी आगारातही प्रवाशांची गर्दी
अलिबाग, ता. १६ ः दिवाळी सणाच्या सुट्ट्या संपवून मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांची अलिबागमध्ये प्रचंड गर्दी उसळली आहे. त्यातच थंडीची चाहूल लागल्याने मुंबईकडून मांडवा बंदरातून अलिबागकडे जाणारी जलवाहतूकही हाउसफुल झाली आहे. जलवाहतुकीसह एसटी बस सेवेलाही प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असूनही अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईसह विविध भागांतील हजारो पर्यटकांनी अलिबाग आणि रायगड जिल्ह्यात गर्दी केली होती. आता सुट्टया संपल्याने हे पर्यटक पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. रस्ते मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच कमी वेळेत मुंबई गाठण्यासाठी अनेक प्रवाशांनी जलवाहतुकीला पसंती दिली आहे.
मांडवा जेट्टीवर रविवारी व सोमवारी सकाळपासूनच तिकीट खरेदीसाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान धावणाऱ्या लाँच, बोटी आणि रो-रो (एमटूएम फेरी) सेवाही प्रवाशांनी गच्च भरून धावत आहेत.
दुसरीकडे, अलिबाग एसटी आगारातही मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन एसटी महामंडळाने पर्यायी व्यवस्था तयार ठेवणे अपेक्षित होते, मात्र अशी कोणतीही व्यवस्था नसल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. विनाथांबा बससेवेचा गाजावाजा केला जात असला, तरी प्रत्यक्षात प्रवाशांच्या गर्दीच्या वेळी अतिरिक्त गाड्याच उपलब्ध नसल्याने ही सेवा केवळ नावापुरतीच असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली.

नियोजनावर प्रश्नचिन्ह
दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर मुंबईकडे परतणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा अंदाज घेऊन एसटी प्रशासनाने नियोजन करणे गरजेचे होते, मात्र जलवाहतूक हाउसफुल आणि एसटी बसची प्रतीक्षा अशा दुहेरी परिस्थितीत प्रवाशांची कोंडी झाली आहे. सणासुदीच्या काळात अतिरिक्त बसगाड्या उपलब्ध करूनही प्रवाशांचा खोळंबा होत असल्‍याने एसटी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.