

रायगडमध्ये भात झोडणीची लगबग
अवकाळीच्या धास्तीने शेतकऱ्यांची धावपळ; पावसाच्या अनियमिततेने उत्पादनाला फटका
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १६ : रायगड जिल्ह्यात भातकापणीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, आता शेतशिवारात झोडणी आणि मळणीची लगबग सुरू झाली आहे. यंदा पावसाच्या लहरीपणामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले असतानाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे केले आहे. काही भागांत कापून ठेवलेले भाताचे भारे पावसात भिजल्याने धान्याचा रंग, गुणवत्ता आणि साठवणुकीवर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे पुन्हा पाऊस सुरू होण्यापूर्वी हातात आलेले पीक सुरक्षितपणे घरात आणण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने गावोगावी खळ्यांमध्ये मळणीची कामे वेगाने सुरू आहेत.
यंदाचा भात हंगाम सुरुवातीपासूनच प्रतिकूल परिस्थितीतून गेला. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने मोठी ओढ दिली. परिणामी शेतातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन जमिनीला भेगा पडल्या. भातरोपांच्या फुटव्याच्या अवस्थेत पुरेसे पाणी न मिळाल्याने पिकाची वाढ खुंटली. दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावरही ओलावा कमी पडल्याने कणसांमध्ये दाणे कमी भरण्याची शक्यता निर्माण झाली. काही भागांत कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनाला आणखी फटका बसला.
या प्रतिकूल परिस्थितीतून पीक कापणीपर्यंत आणलेल्या शेतकऱ्यांसमोर आता अवकाळी पावसाचे आव्हान आहे. कापून ठेवलेले भात भिजल्यास दाण्यांचा रंग बदलणे, दर्जा खालावणे आणि साठवणुकीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी उपलब्ध मनुष्यबळाच्या मदतीने झोडणी-मळणीची कामे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हवामानातील अनिश्चिततेमुळे प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरत आहे.
दुहेरी संकटाची कात्री
यंदा आधी पावसाच्या खंडामुळे भातपिकाच्या वाढीवर परिणाम झाला, तर आता अवकाळीच्या भीतीने कापणी केलेले पीक सुरक्षित ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. सरासरीच्या तुलनेत भात लागवड क्षेत्रातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे कमी क्षेत्रावर झालेली लागवड, प्रतिकूल हवामान आणि काढणीनंतरचे पावसाचे संकट अशा तिहेरी अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्पादन घटण्याची शक्यता असताना हातात आलेले धान्यही खराब होऊ नये, यासाठी शेतकरी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. यंदाचा भात हंगाम रायगडमधील शेतकऱ्यांसाठी मोठी कसोटी ठरत आहे.
भातशेतीची आकडेवारी
तपशील आकडेवारी
जिल्ह्याचे सरासरी भातलागवड क्षेत्र ८७,५३६ हेक्टर
यंदाचे प्रत्यक्ष लागवड क्षेत्र ६१,१०१ हेक्टर
सरासरीच्या तुलनेत लागवड ६९.८० टक्के
वार्षिक सरासरी पर्जन्यमान ३,१४८.६ मिमी
यंदाची पावसाची नोंद २,८९४.७ मिमी
सरासरीच्या तुलनेत पाऊस सुमारे ९२ टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.