

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : बालकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी (ता. २२) उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत पाच वर्षांखालील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. पालकांनी आपल्या बालकांना पोलिओचा डोस द्यावा, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
देशात १९९५ पासून पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येत आहे. भारताने पोलिओवर नियंत्रण मिळविले असले, तरी जगातील काही देशांमध्ये अद्याप या विषाणूचे अस्तित्व आहे. त्यामुळे परदेशातून विषाणूचा संभाव्य प्रसार होण्याचा धोका लक्षात घेता नियमित लसीकरणासोबतच पल्स पोलिओ मोहिमेचे महत्त्व कायम आहे. प्रत्येक वेळी बालकांना पोलिओचा डोस देणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. २२ नोव्हेंबरला ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध लसीकरण केंद्रांवर बालकांना मोफत पोलिओ डोस दिले जाणार आहेत. त्यानंतर २३ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक घरोघरी जाऊन लसीकरण केंद्रांवर न आलेल्या बालकांचा शोध घेतील. गृहभेटींद्वारे अशा बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. पालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये पोलिओची लस विनामूल्य उपलब्ध आहे. या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.