सागरी महामार्गात भूसंपादनाचा अडथळा

सागरी महामार्गात भूसंपादनाचा अडथळा
Published on: 

सागरी महामार्गात भूसंपादनाचा अडथळा
पुलांचे काम वेगात, मात्र जोडरस्‍ते रखडले; ५४ हेक्टरनासाठी एमएसआरडीसीचे प्रयत्‍न
सकाळ वृत्तसेवा

अलिबाग, ता. १६ : रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या कामात रायगड जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या पुलांचा समावेश आहे. या पुलांचे काम वेगात सुरू असले तरी, या पुलांना जोडरस्त्याच्या भूसंपादनाचे काम मार्गी लागलेले नाही. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यात या रस्त्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे.
जमिनीच्या वाढत्या रकमेमुळे या मार्गाचा निश्‍चित आराखडा करण्यातही राष्ट्रीय राज्य रस्ते विकास महामंडळाला अपयश आलेले आहे. रेवस-करंजा, साळाव-रेवदंडा आणि आगरदंडा-दिघी या पुलांसाठी तब्बल ५४ हेक्टर खासगी जागा संपादित करावी लागणार आहे. जोपर्यंत भूसंपादन पूर्ण होत नाही, तोपर्यंत या पुलांचे काम पूर्ण करणे शक्य नसल्याने कंत्राटदारदेखील चिंतेत पडले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. १६) यासंदर्भात खासदार सुनील तटकरे यांनी आढावा बैठक घेतली, यात सागरी महामार्गाच्या महत्त्वाच्या पुलांचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली, परंतु आवश्यक जमिनीचे भूसंपादन किती टक्के झाले याची माहिती अधिकाऱ्यांना देता आली नाही.
मागील ४० वर्षांपासून सागरी महामार्गाचे स्वप्न कोकणी माणसाला दाखवले जात आहे. यासाठी मार्गात वारंवार बदल करण्यात आल्याने आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन अद्याप पूर्ण करता आलेले नाही. पूर्वी फक्त दुपदरी असलेल्या या ५२३ किमीच्या या महामार्गाचे चौपदीकरण करण्यात येणार असून या प्रकल्पाची किंमत २६,४६३ कोटी रुपये आहे. तसेच या मार्गावर नऊ महत्त्वाचे पूल उभारावे लागणार आहेत. यात चार महत्त्वाचे पूल रायगड जिल्ह्यात आहेत. रेवस-करंजा पुलाची निविदा ॲफकॉन, साळाव-रेवदंडा पुलाची निविदा अशोका बिटकॉन आणि दिघी-आगरदांडा पुलाची निविदा हिंदुस्तान कन्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे.
आगरदांडा-दिघी पुलासाठी म्हसळा तालुक्यातील तुरुंबवाडी आणि श्रीवर्धन तालुक्यातील दांडा गावातील ३.५६ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. हे संपादन पूर्ण केल्याशिवाय पुढील काम पूर्ण करण्यात अनेक अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रेवस-करंजासाठी सर्वाधिक कांदळवनची जमीन
रेवस-रेड्डी सागरी महामार्गाचा आरंभबिंदू असलेला रेवस-करंजा हा पूल १०.२० किलोमीमीटर लांबीचा असून, या पुलासाठी सरकारी कांदळवनची जमीन सर्वांत जास्त जात आहे, तर खासगी जमीन १७ हेक्टर संपादित करावी लागणार आहे. यासाठी १२ मार्च रोजी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

साळाव-रेवदंडासाठी सर्वाधिक खासगी जमीन
तर सर्वात जास्त खासगी जमीन साळाव-रेवदंडा पुलासाठी संपादित करावी लागणार आहे. रेवदंडा बाजूला नारळी-पोपळीच्या बागा असल्याने येथील बागायतदारांना वाढीव मोबदला पाहिजे. यासाठी चौल व कोर्लई येथील जमिनीची संयुक्त मोजणी झालेली आहे, तर उसडी, रांजणखार डावली, रेवदंडा येथील शेतकऱ्यांची भूमी अभिलेख विभागाने संयुक्त मोजणी पूर्ण केलेली नाही.

पर्यटनवाढीसाठी मदत
कोकणातील बहुतांशी पर्यटन केंद्रे, समुद्रकिनारे व किल्ले किनारपट्टीवर असल्याने पर्यटन विकासाला गती मिळून मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणात उतरतील. आंबा उत्पादन व मत्स्यव्यवसायाला अधिक गती मिळेल. संरक्षणदृष्ट्या सागरी किनारपट्टीला महत्त्व आहे. या मार्गावर दिघी, आगरदांडा, बाणकोट, बागमांडले, जयगड व दाभोळ हे पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून बांधले जाणार आहेत.

रेवस-करंजा भागातील धरमतर खाडीवरील पूल :
- एकूण लांबी : १०.२० किमी.
- प्रशासकीय मान्यता : ३,०५७ कोटी रुपये
- खासगी भूसंपादन - १७.९७ हेक्टर
- पुलाचा प्रकार : स्टिल ब्रिज (लोखंडी पूल)
- कामाची मुदत : ३ वर्षे - २०२७ मध्ये पूर्ण होईल.

रेवदंडा-साळाव भागातील कुंडलिका खाडीवरील पूल :
- एकूण लांबी : ३.८२ किमी
- प्रशासकीय मान्यता रक्कम : १७३६ कोटी रूपये
- खासगी भूसंपादन - ३२.६४ हेक्टर
- पुलाचा प्रकार : केबल स्टे
- कामाची मुदत : ३ वर्ष

दिघी आगरदांडा भागातील आगरदांडा खाडीवरील पूल :
- एकूण लांबी : ४.३१ किमी.
- प्रशासकीय मान्यता रक्कम : १,३१५ कोटी.
- खासगी भूसंपादन - ३.५६ हेक्टर
- पुलाचा प्रकार : केबल स्टे
- कामाची मुदत : ३ वर्ष

बागमांडला वेश्वी भागातील बाणकोट खाडीवरील पूल :
- एकूण लांबी : १.७११ किमी.
- प्रशासकीय मान्यता : रक्कम ४०८ कोटी रूपये
- खासगी भूसंपादन
- पुलाचा प्रकार : केबल स्टे
- कामाची मुदत : ३ वर्षे

रायगड लोकसभा मतदारसंघात पाच महत्त्वाचे पूल येत आहेत, या पुलांचे काम वेगाने सुरू असले तरी रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन करता आलेले नाही. जमिनीच्या वाढत्या किमतीमुळे महामार्गाच्या बांधकामापेक्षा भूसंपादनासाठी जास्त मोबदला द्यावा लागेल.
- सुनील तटकरे, खासदार, रायगड लोकसभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.