

मुलीच्या मतस्वातंत्र्याला आव्हाडांचा पाठिंबा
नताशा यांच्या विधेयकविरोधी भूमिकेचे केले समर्थन
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध दर्शविणाऱ्या कन्या नताशा आव्हाड यांच्या भूमिकेचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी समर्थन केले आहे. ‘मुलीच्या मतस्वातंत्र्यावर बंधने घालण्याचे काम आमच्या कुटुंबात कोणीही केलेले नाही. तिला तिचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाची संभाव्य भूमिका आणि नताशा यांचे स्वतंत्र मत यामुळे राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.
नताशा आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर भूमिका मांडताना मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणे म्हणजे संविधानाशी प्रतारणा करण्यासारखे असल्याचे म्हटले आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतल्याने त्यांच्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘नताशा माझी एकुलती एक कन्या आहे. तिच्या स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्याचे काम आमच्या कुटुंबात कोणीही केलेले नाही. तिला तिचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. शरद पवार हे लोकशाहीवादी नेते आहेत. तेही तिला गप्प बसविण्यास सांगणार नाहीत.’ नताशा सध्या एका परिषदेसाठी लंडनला गेल्याचेही त्यांनी सांगितले.
...
राजकीय भूमिकांची गल्लत नको
शरद पवार यांच्याबद्दलच्या आपल्या भावना आणि मुलीची स्वतंत्र राजकीय भूमिका यांची गल्लत करू नये, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. ‘माझ्या आणि माझ्या कुटुंबावर पवारसाहेबांचे एवढे उपकार आहेत की, ते या जन्मात फेडता येणार नाहीत. गेली ४० वर्षे मी त्यांना अनुभवत आहे. माझ्यासाठी शरद पवार हेच सर्वस्व आहेत; मात्र माझ्या मुलीलाही माझ्यासारख्याच भावना असतील, असे नाही,’ असे ते म्हणाले. अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि शरद पवार यांची लोकशाहीवादी भूमिका यावर आपण शंभर पानी लेख लिहू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, खासदार नरेश म्हस्के यांच्यावर उपरोधिक टीका करताना ते म्हणाले, ‘ते पत्रिका पाहतात की देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असतात?’
...
‘वरिष्ठांच्या चर्चेत सहभागी नाही’
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर सुरू असलेल्या चर्चेत आपण सहभागी नसल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. ‘माझ्यासमोर या विषयावर कधीही चर्चा झालेली नाही. मी कोणत्याही निर्णयप्रक्रियेत नव्हतो. वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. सुप्रिया सुळे आणि शरद पवार हेच याबाबत निर्णय घेतील,’ असे त्यांनी सांगितले.
...
स्टेटस ठेवले अन् काही वेळात हटवले!
मुलगी नताशा हिचे पक्षाच्या भूमिकेवरून मतभेद उघड झाल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवर ‘दैव जाणिले कुणी’ असे तीन शब्द ठेवले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना आणखी उधाण आले, मात्र काही वेळातच त्यांनी हे स्टेटस हटवले. याबाबत विचारले असता, ‘मी गाणे ऐकत बसलो होतो आणि ते स्टेटसला गेले,’ असे स्पष्टीकरण आव्हाड यांनी दिले. या स्टेटसचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचे सांगत त्यांनी शरद पवार यांच्यावरील निष्ठाही स्पष्ट केली. ‘मी शरद पवारांसोबत आहे. सत्ता असो वा नसो, माझे सर्वस्व शरद पवार आहेत,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.