

सहा कलावंतांना ‘मृद्गंध’ पुरस्कार जाहीर
मुंबई, ता. १६ : लोककलेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या ‘मृद्गंध पुरस्कार २०२६’ची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री तबलावादक सुरेश तळवलकर यांना जाहीर झाला आहे. विठ्ठल उमप यांच्या १६व्या स्मृतिदिनानिमित्त २६ नोव्हेंबरला ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे १६वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
विठ्ठल उमप फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या पुरस्कारांसाठी विविध क्षेत्रांतील सहा कलावंतांची निवड करण्यात आली आहे. जीवनगौरव पुरस्कारासह लोककला क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा, छायाचित्रण आणि पत्रकारितेसाठी पद्मश्री सुधाकर ओळवे, अभिनय व दिग्दर्शनासाठी संदेश कुलकर्णी, अभिनयासाठी अभिनेत्री अमृता सुभाष आणि नवोन्मेष प्रतिभा-गायक या श्रेणीत चैतन्य देवडे (माऊली) यांना सन्मानित करण्यात येणार आहे. शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांची प्रतिकृती असलेले मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
लोककला ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख असून, विठ्ठल उमप यांनी कलेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मनात स्थान निर्माण केले. हा कलावारसा जपण्यासोबतच तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सामाजिक जबाबदारी पार पाडणे, हे फाउंडेशनचे उद्दिष्ट असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि गायक नंदेश उमप यांनी सांगितले. यंदा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनाही मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि आरपीआय नेते नानासाहेब ईंदिसे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.