स्वच्छतेची सामूहिक जबाबदारी

स्वच्छतेची सामूहिक जबाबदारी
Published on: 

स्वच्छतेची सामूहिक जबाबदारी
पुरस्कारानंतर सोशल मीडियावर टीका; अस्वच्छतेचे फोटो व्हायरल, नागरिकांच्या सहभागाचीही अपेक्षा
तुर्भे, ता. १६ (बातमीदार) : स्वच्छ भारत अभियानांतर्गत नवी मुंबई शहराने देशात प्रथम क्रमांक पटकावत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, मात्र या यशानंतर सोशल मीडियावर शहरातील अस्वच्छतेचे फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करून पुरस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही भागांतील कचऱ्याचे ढीग, अस्वच्छ रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी होणारी कचऱ्याची विल्हेवाट यामुळे पुरस्काराच्या दाव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. शहरातील त्रुटी निदर्शनास आणून देणे नागरिकांचा अधिकार असला, तरी स्वच्छतेची जबाबदारी केवळ महानगरपालिका प्रशासनावर टाकून चालणार नाही. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांच्या सहभागाची जोड मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते सत्यवान गायकवाड यांनी मांडली आहे.
महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी दिवस-रात्र मेहनत घेऊन शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतात, मात्र नागरिकांकडूनच रस्ते, पदपथ, मोकळ्या जागा आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात असेल, तर स्वच्छतेचे उद्दिष्ट साध्य होणे कठीण आहे. ‘मी कचरा करणार नाही, तर शहरात कचरा होईलच कसा?’ ही भावना प्रत्येक नवी मुंबईकराने अंगीकारण्याची गरज आहे. घरातील कचऱ्याचे योग्य विलगीकरण, प्लॅस्टिकचा मर्यादित वापर आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे या साध्या सवयी शहराच्या स्वच्छतेत मोठे योगदान देऊ शकतात.

नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा
सोशल मीडियावर अस्वच्छतेचे फोटो प्रसारित करणे चुकीचे नाही. उलट, प्रशासनाच्या निदर्शनास समस्या आणून देण्याचे ते प्रभावी माध्यम आहे, मात्र केवळ टीका करण्याऐवजी स्वतःच्या वर्तनातही बदल घडविणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना समज देणे, कचरा वर्गीकरणाचे नियम पाळणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेणे, यातून नागरिक आपले योगदान देऊ शकतात. स्वच्छता ही केवळ सरकारी मोहीम न राहता लोकचळवळ बनणे गरजेचे आहे.

प्रशासनाची उत्तरदायित्वाची भूमिका
शहरातील अस्वच्छतेबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींकडे महापालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कचरा साचणारी ठिकाणे निश्चित करून तेथे नियमित स्वच्छता, कचरा संकलन आणि योग्य व्यवस्थापनाची व्यवस्था करावी. तसेच, वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणेही गरजेचे आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर स्वच्छतेचा दर्जा टिकविण्याचे आव्हान अधिक महत्त्वाचे ठरते. नवी मुंबईला मिळालेला बहुमान हा केवळ प्रशासनाचा नसून संपूर्ण शहराचा सन्मान आहे. त्यामुळे पुरस्काराच्या समर्थन-विरोधापेक्षा स्वच्छतेचा स्तर कायम राखण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन सत्यवान गायकवाड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.