

मराठी सिनेमाला फायनान्सर नव्हे, निर्मात्यांची गरज
दिग्दर्शक विजय कळमकर यांचे मत
मुंबई, ता. १६ : ‘पैसे गुंतवणारे अनेक जण आहेत; मात्र चित्रपट कसा बनतो, त्यासाठी किती खर्च येतो, अगदी चहापासून ते संपूर्ण टीमच्या खर्चापर्यंत प्रत्येक गोष्टीचे सूक्ष्म ज्ञान असणारे निर्माते फार कमी आहेत,’ अशी खंत दिग्दर्शक विजय कळमकर यांनी व्यक्त केली. ‘आपल्याला फायनान्सर नव्हे, तर निर्मात्यांची गरज आहे,’ असे मत कळमकर यांनी व्यक्त केले.
चित्रपताका-२०२६ महोत्सवात आयोजित ‘गावकुसातला मराठी सिनेमा’ या परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात कळमकर यांच्यासोबत हरीश इथापे, मंगेश बदर, रावबा गजमल आणि शेखर रणखांबे ही मंडळी सहभागी झाली होती. संदीप पाठक यांनी या परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.
कळमकर म्हणाले, ‘आपल्याकडे अजूनही निर्माता आणि फायनान्सर यांच्यातला फरक लोकांना माहिती नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनाचा विचार करून त्यातील कोणते प्रसंग प्रमोशनसाठी वापरता येतील, याची जाण निर्मात्याला असणे आवश्यक आहे. केवळ मोठमोठ्या गोष्टी सांगून लोकांना गुंतवणुकीसाठी तयार करता येते; पण त्यातून चित्रपटसृष्टीचे नुकसान होते आणि असे निर्माते नंतर या क्षेत्रातून बाहेर पडतात.’
ते पुढे म्हणाले, ‘चित्रपटाच्या सुरुवातीपासून प्रदर्शनापर्यंतच्या प्रत्येक टप्प्याची माहिती असणारे खरे निर्माते एकतर मोठ्या स्टुडिओमध्ये काम करत आहेत किंवा स्वतंत्रपणे कार्यरत असले, तरी ते आमच्यासारख्या दिग्दर्शकांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे मातीतला सिनेमा बनवू इच्छिणाऱ्या माझ्यासारख्या दिग्दर्शकांची अशा जाणकार निर्मात्यांपर्यंत पोहोचच होत नाही.’
दिग्दर्शक हरीश इथापे म्हणाले, ‘मराठी सिनेमाचा विस्तार केवळ भौगोलिक मर्यादांपुरता राहिलेला नाही, तर त्याच्या आशयालाही नवी क्षितिजे मिळत आहेत. पूर्वी आम्ही चित्रपटात काम मिळते का, हे पाहण्यासाठी मुंबईकडे यायचो. आता वेगळ्या विषयांच्या शोधात मुंबई आमच्याकडे येत आहे. ग्रामीण भागातही अनेक वेगळे विषय आणि आशयघन कथा आहेत. मराठी सिनेमाचा स्वभावच मुळात आशयप्रधान राहिला आहे.’
साहित्य आणि सिनेमा यांचा अनुबंध जुळून उत्तमोत्तम कथानके सिनेमाध्यमातून प्रेक्षकांसमोर यावीत, अशी अपेक्षा महामंडळाचे माजी मुख्य सचिव जे. पी. डांगे यांनी व्यक्त केली.
----
‘पुस्तक ते सिनेमा’ या परिसंवादात १० निवडक मराठी पुस्तकांच्या लेखकांना आपल्या साहित्यकृती चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकारांसमोर मांडण्याची संधी मिळाली. रोहन किरण क्षीरसागर, अक्षय मोहिते, शर्मिला फडके, क्षितीज देसाई, हीना कौसरखान, अंबर हडप, रोहन देसाई, प्राची बापट, डॉ. स्मिता दातार आणि विवेक कुडू यांनी त्यांच्या साहित्यकृतींचे सादरीकरण केले.
----
चांगला सिनेमा बनण्यासाठी चांगल्या कथेची गरज असते. मराठी साहित्यात अशा चांगल्या कथा असलेली अनेक पुस्तके आहेत. त्यांच्यावर चित्रपट बनायला हवेत. मराठी साहित्याच्या सिनेमा माध्यमांतराला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्या दृष्टीने ‘पुस्तक ते सिनेमा’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
- प्रशांत साजणीकर, सहव्यवस्थापकीय संचालक,
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी, सांस्कृतिक विकास महामंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.