

सावंत यांच्या अपात्रतेची नोटीस जिव्हारी
ठाकरे गटाचे आमदार मुंबई विद्यापीठात
मुंबई, ता. १६ : मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांना विद्यापीठ प्रशासनाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीचे पडसाद आज उमटले. सावंत यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आणि नेत्यांनी मुंबई विद्यापीठात धाव घेऊन कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी आणि प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांची भेट घेतली. नोटीस मागे घेण्याची मागणी आमदारांनी प्रशासनाकडे केली.
शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार ॲड. अनिल परब, अजय चौधरी, सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, ज. मो. अभ्यंकर, सुनील शिंदे, मनोज जामसुतकर, अनंत (बाळा) नर आणि महेश सावंत विद्यापीठात दाखल झाले. सावंत यांना बजावलेली नोटीस १० दिवसांत मागे घ्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या वेळी सिनेट सदस्य शशिकांत झोरे आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर उपस्थित होते.
दरम्यान, या भेटीवर विद्यापीठ प्रशासनाने निवेदनाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. आमदार कोणतीही पूर्वसूचना न देता विद्यापीठात आले. त्या वेळी सहयोगी प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी मुलाखती सुरू होत्या. राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांच्या उपस्थितीत सुरू असलेली ही प्रक्रिया थांबवून आमदारांनी कुलगुरूंशी चर्चा करण्याची मागणी केली, असे विद्यापीठाने म्हटले आहे. दरम्यान, सावंत यांनी नोटिशीला उत्तर दिले असून, त्यावर प्रशासन निर्णय घेणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
...........
प्रतिमा मलिन करणारी वृत्ते
प्रदीप सावंत यांनी विद्यापीठाची प्रतिमा मलिन करणारी आणि दिशाभूल करणारी वृत्ते प्रसिद्ध केल्याचा आरोपही प्रशासनाने केला. जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्थेतील दुरुस्ती सुरू असलेल्या जागेचे छायाचित्र प्रसिद्ध करणे तसेच दूरस्थ शिक्षण केंद्रातील ३,८५० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. सावंत यांना यापूर्वी समज देण्यात आली होती; मात्र सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.