

वाहतूक वॉर्डनच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
पंपहाउस परिसरात नियमांकडे दुर्लक्ष; कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नेमण्याची नागरिकांची मागणी
जोगेश्वरी, ता. १७ (बातमीदार) : अंधेरी पूर्वेतील पंपहाउस परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील पुलाजवळ वाहतूक नियमनासाठी नियुक्त केलेल्या वॉर्डनच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी असतानाही काही वॉर्डन रिक्षामध्ये बसून किंवा मोबाईलवर बोलण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असून, परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत गस्तीवरील वाहनातील वाहतूक निरीक्षक विनायक ताम्हाणकर यांच्याकडे विचारणा केली असता, संबंधित वॉर्डन खासगी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या ठिकाणी वाहतूक पोलिस उपलब्ध नसल्याबाबत तक्रार करण्याचा सल्ला दिला.
या ठिकाणी तैनात असलेले या वॉर्डन वाहतूक नियमन करण्याऐवजी अनेकदा रिक्षामध्ये बसलेल्या किंवा मोबाईलवर बोलत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत विचारणा केली असता, सतत उभे राहिल्याने पाय दुखत असल्याचे आणि मिळणारे मानधन पुरेसे नसल्याचे त्यांनी सांगितल्याचे समजते. तसेच, तक्रार करायची असल्यास करा, असे उत्तरही त्यांनी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. काही वेळा रिक्षाचालकच वाहतुकीचे नियमन करत असल्याचेही दिसून येते.
गणवेशाचे पालन नाही
वॉर्डनसाठी वाहतूक पोलिसांच्या धर्तीचा गणवेश निश्चित असतानाही काही जणांकडून त्याचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. शर्ट व्यवस्थित न घालणे, टोपी आणि ओळखपत्र नसणे अशा प्रकारांमुळे त्यांच्या कर्तव्याविषयीही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच काही वेळा या ठिकाणी वाहतूक पोलिसांची उपस्थिती नसते. परिणामी, नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यात अडचणी येत आहेत.
कारवाई करण्याची मागणी
पंपहाउस परिसरात चोवीस तास वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी. त्यांच्या मदतीसाठी शिस्तबद्ध आणि जबाबदारीने काम करणाऱ्या वॉर्डनची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वाहतूक पोलिस प्रशासनाने या प्रकाराची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.