तुळशी विवाहाच्या साहित्याने नवी मुंबईतील बाजारपेठा सजल्या

तुळशी विवाहाच्या साहित्याने नवी मुंबईतील बाजारपेठा सजल्या
Published on: 

तुळशी विवाहाच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या
पूजेच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग
नेरूळ, ता. १७ (बातमीदार) ः कार्तिक महिन्यातील तुळशी विवाह सोहळा जवळ आल्याने नवी मुंबईतील बाजारपेठा विविध पूजेच्या साहित्याने सजल्या आहेत. घरोघरी पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह साजरा करण्याची प्रथा असल्याने, त्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी लगबग सुरू झाली आहे.
तुळशी विवाहासाठी लागणारी तुळशीची आकर्षक वृंदावने, ऊस, आवळा, चिंच, बोर, हळद-कुंकू, अक्षता, फुले, हार, सजावटीचे साहित्य, तसेच तुळशी विवाहासाठी लागणारे बाशिंग, चुनरी, छोटे मंगळसूत्र, बांगड्या, साडी आणि पूजेचे साहित्य दुकानदारांनी विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. याशिवाय तुळशी वृंदावन सजवण्यासाठी विविध रंगांच्या रांगोळ्या, तोरणे आणि आकर्षक विद्युत रोषणाईच्या साहित्यालाही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. अनेक ठिकाणी दुकानदारांनी एकाच ठिकाणी संपूर्ण पूजेचे साहित्य उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांना खरेदी करणे सोयीचे ठरत आहे. यानिमित्ताने बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी दिवसांत साहित्य खरेदीला आणखी वेग येण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

तुळशीच्या रोपांना मागणी वाढली
बाजारपेठांमध्ये हिरव्या तुळशीसोबतच मंजिरी असलेल्या तुळशीच्या रोपांचीही विक्री होत आहे. लहान कुंड्यांपासून ते आकर्षक सजावटीच्या कुंड्यांमध्ये लावलेल्या तुळशीची रोपे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अनेक नागरिक नवीन तुळशी वृंदावनात तुळशीचे रोप लावण्यासाठी खरेदी करत आहेत.

तुळशी विवाह साहित्याचे दर
तुळशीचे छोटे रोप ३० ते ५०
मोठे तुळशीचे रोप ८० ते १५०
कुंडीसह तुळशीचे रोप १०० ते २५०
तुळशी वृंदावन ३०० ते ८००
ऊस (जोडी) ३० ते ५०
आवळा १० ते २०
बोर २० ते ३०
चिंच २० ते ३०
झेंडूच्या फुलांचा हार ३० ते ६०
फुलांची माळ २० ते ५०
हळद-कुंकू संच २० ते ४०
अक्षता १० ते २०
लहान साडी ५० ते १००
बांगड्यांचा संच २० ते ५०
सजावटीचे तोरण ५० ते १५०
रांगोळी २० ते ५०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.