

मोबाईलला विराम!
अंगणात अवतरले बालशिवभक्तांचे किल्ले
नवी मुंबई, ता. १७ : मोबाईल आणि व्हिडिओ गेम्सच्या आभासी दुनियेत रमणाऱ्या चिमुकल्यांनी काही काळ स्क्रीनपासून दूर होत मातीशी नाते जोडले. हातात माती, दगड आणि कल्पकतेच्या जोरावर त्यांनी सीवूड्समधील सोसायट्यांच्या अंगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे गड-किल्ले उभारले. कुठे रायगड, कुठे सिंहगड, तर कुठे सिंधुदुर्गाच्या प्रतिकृती साकारत बालशिवभक्तांनी स्वराज्याचा इतिहास जिवंत केला. निमित्त होते धर्मवीर संभाजीराजे चॅरिटेबल ट्रस्ट आणि राजमाता जिजाऊ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या ‘भव्य किल्ले बांधणी स्पर्धा २०२६’चे. रविवारी (ता. १५) सेक्टर ४६ येथील श्री शनेश्वर मंदिरात या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, गड-किल्ल्यांची स्थापत्यरचना आणि स्वराज्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सीवूड्समधील सेक्टर ४६, ४८, ४८ ए, ४२, ४४ ए आणि ४४ परिसरातील सोसायट्या, शाळा आणि बालशिवभक्तांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. किल्ल्यांचे बुरूज, महाद्वारे आणि ऐतिहासिक वैशिष्ट्ये बारकाईने साकारत मुलांनी आपल्या कल्पकतेची झलक दाखवली.
स्पर्धेत सेक्टर ४८ येथील संत ज्ञानेश्वर माऊली सोसायटीने प्रथम क्रमांक पटकावत सात हजार रुपये आणि सन्मानचिन्ह मिळवले. सेक्टर ४६ येथील साईकृपा सोसायटीने पाच हजार रुपयांचे द्वितीय, तर सेक्टर ४८ येथील स्नेहमिलन सोसायटीने तीन हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक पटकावले. विशेष म्हणजे, स्पर्धेतील प्रत्येक सहभागी गटाला प्रोत्साहन म्हणून ५०० रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
ट्रस्टचे अध्यक्ष दत्ता घंगाळे आणि मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी घंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास नलावडे, राजेंद्र कांबळे, तेजस पाचपुते, मंगेश पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली. मुलांमध्ये इतिहासाची आवड, संघभावना आणि नेतृत्वगुण रुजवणारा हा उपक्रम यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.