फिजिओथेरपी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनवाढीचा प्रश्न लवकरच मार्गी

फिजिओथेरपी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनवाढीचा प्रश्न लवकरच मार्गी
Published on: 

फिजिओथेरपी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनवाढीचा प्रश्न लवकरच मार्गी
महापौर रितू तावडे यांचे आश्वासन; विद्यावेतनात मोठी तफावत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : राज्य सरकारच्या अखत्यारीतील वैद्यकीय महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांप्रमाणेच मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांतील फिजिओथेरपी आणि व्यवसायोपचार (ऑक्युपेशनल थेरपी) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही वाढीव विद्यावेतन मिळावे, अशी मागणी गेल्या वर्षभरापासून केली जात आहे, मात्र अद्याप या मागणीची पूर्तता झालेली नाही. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी महापौर रितू तावडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रश्नावर लवकरच योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिले.
मुंबई महापालिकेच्या केईएम, बीवायएल नायर आणि लोकमान्य टिळक रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय (सायन) येथे फिजिओथेरपी आणि व्यवसायोपचार विषयांचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी ३० जुलै २०२५ पासून विद्यावेतनवाढीसाठी पाठपुरावा करीत आहेत. राज्य सरकारने आपल्या अखत्यारीतील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे विद्यावेतन वाढवले असताना महापालिकेच्या विद्यार्थ्यांना मात्र अद्याप जुन्याच दराने विद्यावेतन मिळत आहे.
महाराष्ट्र फिजिओथेरपी व व्यवसायोपचार पदव्युत्तर विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थी संघटनेच्या (एमएपीओआरआय) महापालिका विभागाच्या प्रतिनिधींनी आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वन यांच्या सहकार्याने महापौरांची भेट घेतली. या वेळी विद्यार्थ्यांनी विद्यावेतनातील तफावतीकडे लक्ष वेधत सुधारित दर लागू करण्याची मागणी केली. महापौरांनी या मागणीची दखल घेत प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. आमदार तमिळ सेल्वन यांनीही विद्यार्थ्यांना सहकार्य करून या प्रश्नासाठी पुढाकार घेतला.
समान शैक्षणिक पात्रता, कामाचे स्वरूप आणि जबाबदाऱ्या असूनही केवळ संस्थेच्या अखत्यारीतील फरकामुळे विद्यावेतनात तफावत असणे अन्यायकारक असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्य सरकारने लागू केलेले सुधारित विद्यावेतन महापालिकेच्या विद्यार्थ्यांनाही लागू करावे, अशी त्यांची मागणी आहे. या भेटीत संघटनेचे प्रतिनिधी डॉ. चैतन्य ढाकणे, डॉ. सिद्धेश खंडागळे, डॉ. तनय भराडकर आणि डॉ. ऋषिकेश माळवे उपस्थित होते.

शासकीय विद्यार्थ्यांना दुपटीहून अधिक विद्यावेतन
राज्य सरकारने १ जून २०२५ पासून नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील फिजिओथेरपी आणि व्यवसायोपचार विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ केली आहे. त्यानुसार प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे विद्यावेतन प्रतिमहिना १,७५० रुपयांवरून आठ हजार रुपये, तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे विद्यावेतन १७ हजार ३६० रुपयांवरून ३४ हजार ७९० रुपये करण्यात आले आहे, मात्र महापालिकेच्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना ही वाढ अद्याप लागू झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.