

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन केल्याप्रकरणी ठोठावलेला तब्बल दोन कोटी ७२ लाखांचा दंड थकविणे बांधकाम कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. वारंवार मुदत देऊनही दंडाची रक्कम जमा न केल्याने ठाणे तहसीलदार कार्यालयाने आज (ता. १७) कंपनीच्या कासारवडवली येथील मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली. संबंधित मालमत्तेचे मुख्य प्रवेशद्वार सील करून प्रशासनाने थकबाकीदार कंपनीला दणका दिला आहे.
ठाण्यातील मौजे कासारवडवली ते भाईंदरपाडा परिसरातील कामासाठी तीन हजार ५४१ ब्रास मातीचे अनधिकृत उत्खनन केल्याचे महसूल विभागाच्या निदर्शनास आले होते. याप्रकरणी ठाणे तहसीलदार कार्यालयाने ८ जुलै २०२५ रोजी दंडात्मक आदेश पारित करीत जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेडला दोन कोटी ७२ लाखांचा दंड ठोठावला होता, मात्र निर्धारित मुदतीत ही रक्कम जमा करण्यात आली नाही. अखेर थकीत दंडाच्या वसुलीसाठी प्रशासनाने जप्तीची कारवाई केली. मंगळवारी दुपारी १.४० वाजण्याच्या सुमारास बाळकुम मंडळ अधिकारी यांच्या पथकाने ठाणे पश्चिम येथील स्वामी विवेकानंद मार्गावरील संबंधित मालमत्तेवर धडक दिली. या वेळी जप्तीची नोटीस मालमत्तेवर चिकटवून मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्यात आले आणि मालमत्ता अधिकृतपणे सील करण्यात आली. या कारवाईनंतर संबंधित मालमत्तेची विक्री, देणगी अथवा अन्य कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करण्यास प्रशासनाने मनाई केली आहे.