

सोसायट्यांमध्ये भूमिगत कचराकुंड्यांची संकल्पना!
उघड्यावर दिसणाऱ्या कचराकुंड्यांना पर्याय; स्वच्छतेचे मानांकन कायम राखण्यासाठी महापालिकेचा पुढाकार
तुर्भे, ता. १७ (बातमीदार) : स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर नवी मुंबई पालिकेने शहराचे स्वच्छतेतील मानांकन कायम राखण्यासाठी नव्या उपाययोजनांवर भर देण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सार्वजनिक कचराकुंड्या हटवण्यात आल्यानंतर, आता गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात उघड्यावर ठेवण्यात येणाऱ्या कचराकुंड्यांनाही पर्याय शोधला जात आहे. त्यासाठी सोसायट्यांमध्ये भूमिगत कचराकुंड्यांची संकल्पना राबवण्याचा महापालिकेचा विचार असून, आगामी वर्षात याबाबत रहिवासी आणि सोसायटी पदाधिकाऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.
नवी मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महापालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून विविध उपक्रम राबवले जात आहेत. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, नियमित संकलन, वाहतूक आणि शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यावर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ओला, सुका आणि घातक कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्यानंतर संबंधित कचरा प्रक्रिया केंद्रांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या कचऱ्याची स्वतंत्र विल्हेवाट लावण्यासाठीही महापालिकेने पावले उचलली आहेत. कपड्यांच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बेलापूर येथे विशेष प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कपड्यांच्या कचऱ्याचे स्वतंत्र संकलन आणि प्रक्रिया करणे शक्य झाले आहे.
दरम्यान, शहरातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या सार्वजनिक कचराकुंड्या टप्प्याटप्प्याने हटवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता घंटागाडी आल्यावर तिच्याकडेच कचरा द्यावा, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अनेक भागांतील सार्वजनिक कचराकुंड्या हटल्या असून, रस्त्यांवर कचरा साचण्याचे प्रमाण कमी करण्यास मदत झाली आहे. मात्र, शहरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात आजही ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र कचराकुंड्या उघड्यावर ठेवण्यात येतात. या कुंड्यांमध्ये कचरा साचल्याने काही ठिकाणी दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण होते. तसेच, सोसायट्यांच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा मोकळ्या जागेत ठेवलेल्या कचराकुंड्यांमुळे परिसराच्या सौंदर्यावरही परिणाम होतो. त्यामुळे आता सोसायट्यांमधील कचरा व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध करण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.
भूमिगत कचराकुंड्यांबाबत जनजागृती
शहरातील सार्वजनिक कचराकुंड्या हटविल्यानंतर सोसायट्यांमधील कचराकुंड्याही उघड्यावर दिसू नयेत, यासाठी भूमिगत कचराकुंड्यांचा पर्याय पुढे आला आहे. या व्यवस्थेमुळे कचरा साठवण्याची सुविधा कायम राहणार असून, कचराकुंड्या उघड्यावर दिसणार नाहीत. या संकल्पनेबाबत आगामी वर्षात सोसायटी पदाधिकारी आणि रहिवाशांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात मिळवलेला देशातील पहिला क्रमांक कायम राखण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांसोबतच नागरिकांचा आणि गृहनिर्माण सोसायट्यांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.