

कालव्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
काळ नदीची सफाई, बंधाऱ्यांची डागडुजी आणि मजबुतीकरण रखडले
माणगाव, ता. १७ (वार्ताहर) : अपुऱ्या पावसामुळे यंदा शेतीचे मोठे नुकसान झाले असून, आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत माणगाव तालुक्यातील काळ प्रकल्पाचा कालवा शेती आणि पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे, मात्र या कालव्याची नियमित साफसफाई, बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि मजबुतीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये नाराजी आहे. डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात कालव्यातून पाणी सोडण्याची अपेक्षा असताना त्यापूर्वी आवश्यक कामे पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे.
काळ प्रकल्पाचा कालवा माणगाव तालुक्यातील शेतीसाठी उपयुक्त आहे. उन्हाळी हंगामातील पिकांना पाणी देण्याबरोबरच कडधान्य शेती आणि परिसरातील विहिरींची पाणीपातळी टिकवून ठेवण्यास या कालव्याची मदत होते. तसेच काळनदीतील पाण्याचे संतुलन राखण्यासह माणगाव शहराच्या पाणीपुरवठ्यालाही त्याचा फायदा होतो. त्यामुळे कालव्याची नियमित देखभाल आवश्यक आहे.
पूर्वी प्रकल्प विभागाचे कर्मचारी मजूर लावून कालव्याच्या दोन्ही बाजूंचे गवत काढणे, साफसफाई आणि डागडुजी करीत असत. मात्र, सध्या कालव्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून, बंधाऱ्यांचीही दुरवस्था झाली आहे. बंधाऱ्यांना खेकड्यांनी केलेल्या बिळांमुळे पाण्याची गळती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंधारे फुटण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो. उतेखोल परिसरातून जाणाऱ्या कालव्याच्या शहरातील सुमारे ५०० मीटर भागाचे काँक्रीटीकरण केल्यास गळतीची समस्या कमी होऊ शकते.
२५ जानेवारी २०२१ रोजी तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी माणगाव येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी कालव्याची दुरुस्ती व मजबुतीकरण करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप या कामांना अपेक्षित गती मिळालेली नाही. पावसाळ्यात कालव्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड होत असते, त्यामुळे पावसाळ्यानंतर दरवर्षी अशा प्रकारे डागडुजी करावी लागते, मात्र या वेळी निधीअभावी काम रखडले आहे, अशी माहिती कोलाड लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही डागडुजी पूर्ण झाल्यावर नियमितपणे पाणीपुरवठा सुरू होईल.
लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे
पालकमंत्री भरत गोगावले, आमदार आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांनी या प्रश्नात लक्ष घालावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. कालव्याची साफसफाई, बंधाऱ्यांची तांत्रिक तपासणी आणि आवश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाची कामे तातडीने करावीत. विकासाच्या घोषणांपेक्षा शेती आणि नागरिकांच्या पाण्याच्या गरजेसाठी हा महत्त्वाचा जलस्रोत सक्षम करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.