

वाहतूक कोंडीने घेतला चिमुरड्याचा जीव
रुग्णवाहिका अलिबाग मार्गावरील कोंडीत अडकली
अलिबाग, ता. १७ (वार्ताहर) : अलिबाग तालुक्यातील बेलकडे-अलिबाग मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे एका दोन वर्षांच्या चिमुकल्याने आपला जीव गमावल्याची घटना सोमवारी (ता. १६) घडली. या घटनेमुळे तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी दीड ते दोनच्या सुमारास बामणगाव येथील आरांश सुशील ठाकूर याने खेळताना फुगा गिळला. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी त्याला रुग्णवाहिकेतून अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले, मात्र बेलकडे-अलिबाग मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. परिणामी, रुग्णवाहिकेलाही वाहतूक कोंडीतून मार्ग काढणे कठीण झाले. दुपारी सुमारे चारच्या सुमारास रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयात पोहोचली, मात्र तोपर्यंत आरांशचा मृत्यू झाला होता. अवघ्या दोन वर्षांच्या बालकाचा असा अंत झाल्याने बामणगाव परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांना चिमुकल्या आरांशचा मृतदेह घरी नेतानाही कोंडीत अडकावे लागले. त्यासाठी तब्बल दोन तासांहून अधिक वेळ लागल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. या घटनेने अलिबागमधील रस्त्यांच्या कामांच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
-----------------------
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
बेलकडे-अलिबाग मार्गावरील कामाच्या ठिकाणी आपत्कालीन वाहतुकीसाठी कोणती व्यवस्था करण्यात आली होती? याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती देणे गरजेचे आहे. विकासकामे सुरू असताना आपत्कालीन सेवांचा मार्ग बंद होऊ नये, यासाठी प्रशासन व ठेकेदाराने आवश्यक ती पर्यायी व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक आहे. आरांशच्या मृत्यूने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीने वेळेवर उपचार मिळण्यात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
-----------------
दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतरच काम सुरू करावे, अशा सक्त सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या होत्या, परंतु त्याआधीच ठेकेदाराने काम सुरू केल्याने सर्व गोंधळ उडाला आहे. वाहतूक पोलिस अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी कार्यरत आहेत. पर्यायी मार्गांनी वाहतूक वळवून वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असेल.
- सचिन पवार, पोलिस निरीक्षक, जिल्हा वाहतूक नियंत्रण कक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.