

महिला पदाधिकाऱ्यांकडून भाजपला घरचा आहेर
‘आवाज उठवला नसता, तर नदी अस्वच्छच राहिली असती’; सत्ताधाऱ्यांना सुनावले
बदलापूर, ता. १७ (बातमीदार) : उल्हास नदीपात्रातील अनधिकृत भराव आणि छठपूजेच्या आयोजनावरून निर्माण झालेल्या वादात आता भाजपमधूनच सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर देण्यात आला आहे. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या सचिव तथा माजी महिला शहराध्यक्ष मीनल मोरे यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध करून पक्षातील सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘आम्ही आवाज उठवला नसता, तर उल्हास नदी इतक्या लवकर स्वच्छ झालीच नसती,’ अशा शब्दांत त्यांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना सुनावले आहे.
आपण भाजपच्या पदाधिकारी असलो, तरी चुकीला चूक म्हणण्याची धमक आपल्यात आहे, असे स्पष्ट करत त्यांनी नदीपात्रात अनधिकृत मातीचा भराव टाकून छठपूजेचे आयोजन करण्यास विरोध दर्शविला. कोणत्याही धर्माच्या, जातीच्या किंवा समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना विरोध नाही; मात्र असे कार्यक्रम नियमांच्या चौकटीत राहूनच झाले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. छठपूजेनंतर नदीपात्रात आणि नदीकाठावर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली असती, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. याप्रकरणी उल्हास नदी बचाव समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेली आक्रमक भूमिका योग्यच होती, असे समर्थनही मोरे यांनी केले.
छठपूजा संपल्यानंतर उल्हास नदीकाठाची तातडीने स्वच्छता करण्यात आली. इतर शहरांच्या तुलनेत बदलापूरमध्ये स्वच्छतेची कार्यवाही लवकर झाली. याचे श्रेय नदीपात्रातील अनधिकृत कामाविरोधात उठविलेल्या आवाजाला जाते, असा दावा मीनल मोरे यांनी केला. विरोध झाला नसता, तर छठपूजेनंतर दोन दिवस उलटूनही नदीकाठावर अस्वच्छता कायम राहिली असती, असेही त्या म्हणाल्या.
------------------------------
मातीचा भराव काढण्याचे काम सुरू
नदीकाठावर टाकण्यात आलेला अनधिकृत मातीचा भराव काढण्याचे काम कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने सुरू केले असून, या कामाचा खर्च आयोजकांकडून वसूल करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे, मात्र मातीचा भराव टाकला जात असतानाच प्रशासनाने हस्तक्षेप करून हा प्रकार रोखायला हवा होता, असे मोरे यांनी म्हटले आहे. आयोजक किंवा संबंधित दोषींवर वेळीच कारवाई झाली नाही, तर भविष्यात कोणीही नदीपात्रावर मालकी हक्क दाखवून नियम धाब्यावर बसवत कार्यक्रमांचे आयोजन करेल. केवळ माती हटवून हा प्रश्न संपणार नाही, तर अनधिकृत भरावाला जबाबदार असलेल्या आयोजकांसह इतर दोषींवर महसूल विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी मोरे यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.