अभ्यूदयनगरच्या पुनर्विकासाचा तिढा सुटला

अभ्यूदयनगरच्या पुनर्विकासाचा तिढा सुटला
Published on: 

‘अभ्युदयनगर’चा मार्ग मोकळा
रहिवाशांच्या विविध मागण्या मान्य
मुंबई, ता. १७ ः अभ्युदयनगरच्या पुनर्विकासासंदर्भात म्हाडा कार्यालयात सोमवारी झालेल्या बैठकीत रहिवाशांनी मांडलेल्या मागण्या म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी मान्य केल्या. या वेळी जयस्वाल यांनी शंकानिरसन केल्यामुळे प्रकल्पातील तिढा सुटला असून, प्रकल्प लवकरच सुरू होईल, असा विश्वास स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.
दरेकर यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीला म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर, भाजप आमदार चित्रा वाघ, मनसे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी, अभ्युदयनगर गृहनिर्माण संस्थांच्या महासंघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार काटकर, विलास सावंत यांच्यासह अभ्युदयनगरमधील ४८ सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. या बैठकीत म्हाडा उपाध्यक्षांनी प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरणदेखील केले.
रहिवाशांच्या शंका आणि मागण्यामुळे हा प्रकल्प पुढे सरकत नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत सर्वपक्षीय बैठक घेऊन या शंका दूर करण्यास आम्हाला सांगितले होते. या वेळी रहिवाशांच्या बहुतांश मागण्या म्हाडाकडून मान्य करण्यात आल्या. म्हाडा देऊ करीत असलेले ६४१ चौ. फूट क्षेत्रफळ वाढवण्याचा आग्रह होता; मात्र हा प्रकल्प व्यवहार्य करायचा असेल, तर या मागणीचा जास्त आग्रह लोकांनी धरू नये, अन्यथा विकसक या प्रकल्पातून बाहेर पडण्याची व त्यामुळे प्रकल्प लांबण्याची शक्यता असल्याचे उपाध्यक्षांनी आकडेवारीनिशी दाखवून दिल्याचे आमदार दरेकर यांनी सांगितले.
----
भाडेवाढीचा प्रस्ताव
रहिवाशांसाठी २० हजार रुपये भाडे प्रस्तावित करण्यात आले होते, ते मुख्यमंत्र्यांनी २५ हजार रुपयांपर्यंत वाढवले. त्यातही वाढ करण्याची रहिवाशांची मागणी आहे. ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवली जाईल. या दोन मुद्यांखेरीज सर्व प्रश्न सुटल्याने आता रहिवाशांनी संमती पत्र देण्यास सुरुवात करावी, असे आवाहनही दरेकर यांनी बैठकीअंती केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.