दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा अपूर्णच!

दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा अपूर्णच!
Published on: 

दिलीप कुमार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा अपूर्णच!
शुभा खोटेंचा आठवणींना उजाळा; सात दशकांचा अभिनय प्रवास

मुंबई, ता. १७ : ‘दिलीप कुमार हे माझे आवडते अभिनेते आहेत, त्यांनी विनोदी, खलनायकी अशा विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मात्र मला कधीच मिळाली नाही,’ असे उद्गार ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी काढले. ‘चित्रपताका’ या महोत्सवातील विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या.

खोटे यांनी सांगितले की, ‘माझ्या वाट्याला आलेल्या भूमिकांबद्दल मी पूर्ण समाधानी आहे, प्रत्येक भूमिका समरसून साकारली. त्यामुळे आता आणखी एखादी विशिष्ट भूमिका करायची राहिली आहे, असे मला वाटत नाही.’ सात दशकांहून अधिक काळ हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या शुभा खोटे यांनी या संवादातून आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी संकुलात सुरू असलेल्या ‘चित्रपताका’ मराठी चित्रपट महोत्सवात ‘क्वीन ऑफ द कॉमेडी... गप्पा शुभा खोटेंशी!’ या विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले होते. भूमिका स्वीकारल्यानंतर तिचा स्वभाव, पार्श्वभूमी आणि बारकावे समजून घेण्यावर आपला भर असतो, असे सांगताना त्यांनी अभिनयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला. या वेळी अभिनेते मेहमूद यांच्यासोबत काम करतानाच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या. अभिनेत्री नूतन यांच्याशी असलेल्या मैत्रीचा उल्लेख करताना दोघींचे एकमेकींच्या घरी जाणे आणि एकत्र वेळ घालवण्याचे किस्से त्यांनी सांगितले. शुभा खोटे यांच्या या संवादातून त्यांच्या कारकिर्दीतील विविध टप्पे, सहकलाकारांसोबतचे जिव्हाळ्याचे संबंध आणि अभिनयाविषयीची भूमिका समोर आली. त्यांच्या अनुभवांमधून हिंदी चित्रपटसृष्टीतील जुन्या काळातील अनेक आठवणींना उजाळा मिळाला.

पुरस्कारपासून अद्याप वंचित
ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे, मात्र आजवर त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी तरी त्यांना व्ही. शांताराम जीवनगौरव किंवा राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात यावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.