

वसईतील नाले प्रदूषित
नागरिकांसह मुक्या जनावरांच्या जीवाला धोका
वसई, ता. १८ (बातमीदार) : एकीकडे जलसंवर्धन आणि स्वच्छतेचा जागर केला जात असताना वसई-विरार शहरात मात्र अस्वच्छतेचे चित्र समोर येत आहे. शहरातील सांडपाण्याचा निचरा करणाऱ्या अनेक नाल्यांमध्ये गाळ, प्लॅस्टिक आणि कचरा साचल्याने ते प्रदूषणाचे केंद्र बनले आहेत. नाल्यांमध्ये वाढलेली जलपर्णी, साचलेले दूषित पाणी आणि परिसरात पसरलेली दुर्गंधी यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे, नाल्यांच्या काठावर साचलेल्या कचऱ्यात अन्न शोधणाऱ्या भटक्या जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक जाण्याचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे नाले स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
वसई-विरार महापालिका क्षेत्रात १४० हून अधिक लहान-मोठे नाले आहेत. पावसाळ्यापूर्वी या नाल्यांची साफसफाई करून पाण्याचा निचरा सुरळीत राहावा आणि पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जाते, मात्र पावसाळ्यानंतर या नाल्यांच्या देखभालीकडे पुरेसे लक्ष दिले जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली असून, कचरा आणि गाळामुळे पाण्याचा प्रवाहही अडथळला जात आहे.
चौकट
दुर्गंधी आणि डासांमध्ये वाढ
नाल्यांच्या काठावर कचऱ्याचे ढीग साचले असून, प्लॅस्टिकच्या पिशव्या, खाद्यपदार्थांचे अवशेष आणि अन्य टाकाऊ वस्तूंमुळे परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे. कचऱ्यामुळे नाल्यांतील पाण्याचा प्रवाह मंदावून काही ठिकाणी दूषित पाणी साचून राहत आहे. परिणामी, परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून, डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मलेरिया, डेंगी यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. नाल्यांमध्ये आणि त्यांच्या काठावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.
चौकट
ढिगाऱ्यांमधील अन्न घातक
नाल्यांच्या काठावर साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये भटकी जनावरे अन्नाच्या शोधात फिरत असतात. या कचऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि अन्य घातक वस्तू असतात. अन्नपदार्थांसोबत प्लॅस्टिकही जनावरांच्या पोटात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. नागरिकांच्या आरोग्यासोबतच मुक्या जनावरांच्या जीविताचा प्रश्नही या प्रदूषणामुळे ऐरणीवर आला आहे.
कोट
नाले स्वच्छ राहावेत यासाठी प्रशासनाकडून नियमित खबरदारी घेतली जाते, मात्र ज्या ठिकाणी कचरा साचलेला आहे किंवा नागरिकांकडून नाल्यांमध्ये कचरा टाकला जात आहे, अशा ठिकाणांची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.
- जितेंद्र नाईक, सहाय्यक आयुक्त, स्वच्छता विभाग
-----------
वसई : नाला कचऱ्याने तुडुंब भरला असून, त्याच लगत मुके प्राणी अन्न शोधत असताना दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.