

उद्यानासाठी नेरूळकरांचा लढा!
दोन हजार ५०० नागरिकांच्या स्वाक्षऱ्या; पार्किंग प्रकल्प रद्द करण्याची मागणी
जुईनगर, ता. १८ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर आठ येथील राजर्षी शाहू महाराज उद्यानाच्या जागेवर प्रस्तावित भूमिगत वाहनतळ प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. उद्यानाचे अस्तित्व टिकवण्यासाठी नेरूळ रहिवासी संघाने सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेला तब्बल २,५०० नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.
‘भूमिगत पार्किंग नको, उद्यानच हवे’ अशी ठाम भूमिका घेत नागरिकांनी प्रशासनाविरोधात आंदोलनाची तयारी केली आहे. प्रकल्पाची प्रक्रिया थांबवण्यासाठी महापालिका प्रशासनाला १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत निर्णय न झाल्यास उद्यानाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा संघाने दिला आहे.
राजर्षी शाहू महाराज उद्यान हे परिसरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वाचे ठिकाण आहे, मात्र याच उद्यानाच्या जागेवर भूमिगत वाहनतळ उभारण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. उद्यानाच्या जागेचे संरक्षण करण्यासाठी रहिवाशी संघाने स्वाक्षरी मोहीम राबवली. या मोहिमेत नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून उद्यान वाचवण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. दिवाळीनिमित्त ‘एक दिवा - उद्यान वाचवण्यासाठी’ हा उपक्रम राबवून हजारो दिवे प्रज्वलित करण्यात आले. या माध्यमातून नागरिकांनी उद्यानाच्या संरक्षणासाठी एकजुटीचे दर्शन घडवले.
स्वाक्षरी फलक फाडल्याने संताप
नागरिकांचा वाढता विरोध आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेली स्वाक्षरी मोहीम सुरू असतानाच स्वाक्षरी फलक फाडण्यात आल्याचा प्रकार समोर आला. काही उपद्रवी व्यक्तींनी हा प्रकार केल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. उद्यान वाचवण्याच्या मोहिमेला विरोध करण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
आयुक्तांना निवेदन
या प्रश्नावर नेरूळ रहिवासी संघाच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष ॲड. स्वप्नील घोलप, सीए श्वेता पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ते अनार्जित चव्हाण आणि नरेंद्र पांडे यांनी महापालिका आयुक्त तसेच शहर अभियंत्यांची भेट घेतली. प्रस्तावित प्रकल्पाला विरोध दर्शवणारे सविस्तर निवेदन सादर करून संपूर्ण प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली.
विकासाला विरोध नाही!
आम्ही विकासाच्या विरोधात नाही; मात्र विकासाच्या नावाखाली अनेक वर्षांपासून नागरिकांच्या वापरात असलेल्या उद्यानाचा ऱ्हास सहन करणार नाही. प्रशासनाने १५ दिवसांत प्रकल्प थांबवण्याबाबत ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा उद्यानाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण पुकारण्यात येईल, असा इशारा नेरूळ रहिवाशी संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्निल घोलप यांनी दिला.
शहरात सुरू असलेल्या पुनर्विकासामुळे भविष्यात वाहनतळाची समस्या कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास करून उद्यानाच्या जागेवर वाहनतळ उभारणे योग्य नाही. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोकळ्या जागा आणि उद्याने जपली पाहिजेत, असे मत माहिती अधिकार कार्यकर्ते अनार्जित चव्हाण यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.