ठाण्यात उद्यापासून रंगणार ‘मिनी ऑलिम्पिक’

ठाण्यात उद्यापासून रंगणार ‘मिनी ऑलिम्पिक’
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबविण्यात येणाऱ्या ‘सांसद खेल महोत्सव’अंतर्गत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून शुक्रवार(ता. २०)पासून ‘खासदार क्रीडासंग्राम सीझन २’चे आयोजन करण्यात आले आहे. २९ नोव्हेंबरपर्यंत कल्याण, ठाणे आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये हा क्रीडामहोत्सव रंगणार असून, यामध्ये ७५ हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. तब्बल ३१ विविध क्रीडाप्रकार आणि ३२ हून अधिक अधिक क्रीडास्थळांवर आयोजित होणारा हा क्रीडामहोत्सव म्हणजे ठाणे जिल्ह्याचे एक प्रकारचे ‘मिनी ऑलिम्पिक’ ठरणार आहे.

ठाण्यातील हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे खासदार क्रीडा संग्राम उपक्रमाची मंगळवारी (ता. १७) पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. बॅडमिंटन असोसिएशनचे श्रीकांत वाड यांच्यासह विविध खेळांच्या संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारीदेखील उपस्थित होते. डोंबिवली येथील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात होणार आहे, तर देशाचे क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या मुख्य उपस्थितीत उपक्रमाची सांगता होणार आहे. तसेच खेळाडूंना मार्गदर्शनासाठी आणि भेटीसाठी विविध क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय खेळाडूदेखील आवर्जून उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सांसद खेल महोत्सव’च्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी व्यापक उपक्रमाची संकल्पना मांडली आहे. याच संकल्पनेला अनुसरून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खासदार क्रीडासंग्रामची सुरुवात केली आहे.

पारंपरिक, आधुनिक क्रीडाप्रकारांचा अनोखा संगम
यंदाच्या खासदार क्रीडासंग्रामचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तब्बल ३१ विविध क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. पारंपरिक भारतीय खेळांचा वारसा जपतानाच आधुनिक आणि नव्या पिढीला आकर्षित करणाऱ्या खेळांनाही यामध्ये स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आजच्या जेन झी आणि युवा पिढीच्या आवडीचे खेळ तसेच आपल्या पारंपरिक क्रीडा संस्कृतीतील खेळ यांचा सुंदर मिलाफ या क्रीडासंग्राममध्ये पाहायला मिळणार आहे.

३२ क्रीडास्थळांवर होणार स्पर्धा
या क्रीडामहोत्सवासाठी ठाणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये स्वतंत्र विभागीय केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. नवी मुंबई, दिवा, कळवा, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम, कल्याण पूर्व आणि पश्चिम, कल्याण ग्रामीण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर तसेच ठाणे शहरातील विविध विभागांचा यामध्ये समावेश आहे. सुमारे ३२ हून अधिक क्रीडास्थळांवर विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.

युवा पिढीला क्रीडाक्षेत्रात प्रोत्साहन देण्याच्या आणि स्थानिक पातळीवरील क्रीडा प्रतिभेला मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. तसेच यामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना कशा पद्धतीने भविष्यात अधिक संधी देता येईल, याबाबतदेखील काम करणार आहे.
- डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.