कल्याणमध्ये दोन सत्रांत नाट्यप्रयोगांची मेजवानी

कल्याणमध्ये दोन सत्रांत नाट्यप्रयोगांची मेजवानी
Published on: 

कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : महाराष्ट्राच्या समृद्ध नाट्यपरंपरेचा वारसा जपणाऱ्या आणि हौशी रंगकर्मींना आपल्या अभिनयकौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ६५व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला कल्याण केंद्रात उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे उद्‍घाटन कल्याण पश्चिमेतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे झाले. यंदाच्या स्पर्धेला नाट्यसंस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल २३ नाट्यसंस्थांनी आपल्या प्रवेशिका सादर केल्या आहेत.

हौशी मराठी रंगभूमीला प्रोत्साहन देणे, नवोदित कलाकारांना आपली अभिनयक्षमता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देणे आणि मराठी नाट्यकलेचा सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, हा या स्पर्धेचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्यसंस्थांच्या संख्येमुळे यंदा कल्याण केंद्रातील स्पर्धेचे आयोजन अधिक व्यापक स्वरूपात करण्यात आले आहे. स्पर्धेच्या उद्‍घाटनप्रसंगी समन्वयक शिवाजी शिंदे, नाट्य परिषद कल्याणचे रवींद्र सावंत, अभिनेत्री सुजाता डांगे, निहारिका राजदत्त आणि नाट्यकर्मी हेमंत यादगिरे यांच्यासह नाट्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रवेशिकांची संख्या लक्षात घेता नाट्यप्रयोगांचे आयोजन सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रांत करण्यात येणार आहे. त्यामुळे नाट्यरसिकांना विविध विषयांवरील नाट्यप्रयोगांचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी नाट्यकर्मी संजय कुलकर्णी, विजय रावळ, नाट्यकर्मी डॉ. नेत्रा मालाडकर यांची परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नाटकातील आशय, अभिनय, दिग्दर्शन, रंगमंचीय मांडणी आणि एकूण सादरीकरण अशा विविध कलात्मक पैलूंच्या आधारे स्पर्धेतील नाट्यप्रयोगांचे परीक्षण केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.