

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा जपणाऱ्या संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोहाचे यंदा ३१वे वर्ष असून, २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान ठाणेकर रसिकांना तीन दिवस सुरेल सांगीतिक मेजवानी अनुभवता येणार आहे. ठाणे महापालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने राम गणेश गडकरी रंगायतन येथे या समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा संगीतभूषण पं. राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ संगीत कलाकार पं. शैलेश भागवत यांना, तर युवा पुरस्कार हेमा उपासनी यांना प्रदान करण्यात येणार आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यंदाच्या समारोहात शास्त्रीय गायन-वादनासह संगीत नाटक, नृत्य आणि विशेष सांगीतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप ५१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल, तर युवा पुरस्कारप्राप्त हेमा उपासनी यांना २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल देऊन गौरविण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता श्रुती मराठे यांच्या गायनाने समारोहाचा प्रारंभ होईल. त्यानंतर रात्री ८.३० वाजता पद्मविभूषण डॉ. एन. राजम यांचे व्हायोलिनवादन रंगणार आहे. पहिल्याच दिवशी दोन मान्यवर कलाकारांच्या सादरीकरणामुळे रसिकांना अभिजात संगीताचा अनुभव घेता येणार आहे. २८ नोव्हेंबरला दुपारी साडेतीन वाजता पुण्यातील भरत नाट्यमंदिर संस्थेतर्फे ‘बंध रेशमाचे’ या संगीत नाटकाचे सादरीकरण होईल. रात्री आठ वाजता वेदश्री खाडीलकर ओक आणि आदित्य ओक यांचा ‘आशाताई एक सूरदासी’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर होणार आहे. रात्री ९.३० वाजता गायिका सावनी शेंडे यांच्या गायनाने दुसऱ्या दिवसाची सांगता होईल.
किशोरीताईंच्या गायकीचा स्वरानुभव
२९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या समग्र गायकीचा वेध घेणारा ‘स्वरानुभूती’ हा विशेष कार्यक्रम विदुषी नंदिनी बेडेकर आणि त्यांच्या शिष्या सादर करणार आहेत. दुपारी चार वाजता यती भागवत आणि स्वप्नील भिसे यांचे तबला सहवादन होईल. त्यानंतर पं. मुकुंदराज देव यांचा गायन, वादन आणि नृत्य यांचा संगम असलेला ‘अनुभूती’ हा कार्यक्रम रंगणार आहे. सायंकाळी सात वाजता ओंकार दादरकर, रात्री साडेआठ वाजता पं. गिरीष संझगिरी यांचे गायन होईल. रात्री १० वाजता पं. सुहास व्यास यांच्या गायनाने तीन दिवसीय समारोहाची सांगता होणार आहे.
प्रवेशिका विनामूल्य
सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य असून, २२ नोव्हेंबरपासून राम गणेश गडकरी रंगायतन येथे प्रवेशिका उपलब्ध होणार आहेत. ठाणेकर संगीतप्रेमी आणि कलारसिकांनी या सांगीतिक पर्वणीचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.