दिव्यातील बंगल्यावर मध्यरात्री दरोडा

दिव्यातील बंगल्यावर मध्यरात्री दरोडा
Published on: 

दिव्यातील बंगल्यावर मध्यरात्री दरोडा
सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : दिव्यातील आगासन गावात मध्यरात्री नऊ दरोडेखोरांनी व्यावसायिक तुकाराम मुंढे यांच्या बंगल्यात घुसून सोन्याचे दागिने आणि रोकड असा दोन लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी बंगल्यातील व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याचे तोंड आणि हात-पाय घरातील कापडाने बांधून ठेवले. त्यानंतर बेडरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र घरातील व्यक्तीने मोबाईलवरून मदत मागितल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.
दिव्यामधील आगासन गावातील बंगल्यात मंगळवारी (ता. १७) रात्री १.५३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बंगल्यातील देवघराच्या मागील बाजूच्या खिडकीची जाळी तोडून एका दरोडेखोराने आत प्रवेश केला. त्यानंतर दरवाजा आतून उघडून त्याने अन्य आठ साथीदारांना बंगल्यात घेतले. अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील या नऊ दरोडेखोरांनी बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील बेडरूममधील एक लाख ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि ८४ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. दरम्यान, हॉलमध्ये झोपलेल्या संतोष शेडगे यांना चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांचे तोंड रुमालाने, तर हात-पाय घरातील कापडाने बांधले. त्यानंतर फिर्यादी झोपलेल्या बेडरूमचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र फिर्यादी मुंढे यांनी मोबाईलवरून मदतीसाठी संपर्क साधल्याचे दरोडेखोरांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात नऊ अनोळखी दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. गुन्हे शाखेची पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.