बाळाच्या चेहऱ्याची आता थ्रीडी प्रतिकृती

बाळाच्या चेहऱ्याची आता थ्रीडी प्रतिकृती
Published on: 

बाळाच्या चेहऱ्याची आता थ्रीडी प्रतिकृती
साेनाेग्राफीत एआय, थ्रीडी मुद्रण तंत्रज्ञानाचा वापर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : गर्भधारणेदरम्यान सोनोग्राफीत दिसणाऱ्या बाळाच्या चेहऱ्याची प्रतिकृती आता त्रिमितीय (थ्रीडी) स्वरूपात जतन करता येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि थ्रीडी मुद्रण तंत्रज्ञानाच्या मदतीने ही सुविधा भारतात उपलब्ध झाली आहे. ‘फर्स्टएम्ब्रेस’ असे या तंत्रज्ञानाचे नाव असून, ‘लाइफप्रिंट ३डी’कडून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

तंत्रज्ञानात सोनोग्राफीच्या प्रतिमांचे संगणकीय विश्लेषण करून बाळाच्या चेहऱ्याचे हाताळता येण्याजोगे थ्रीडी प्रारूप तयार केले जाते; मात्र प्रतिकृतीचा दर्जा सोनोग्राफीतील प्रतिमांची स्पष्टता आणि गर्भातील बाळाच्या स्थितीवर अवलंबून असतो. मूळ प्रतिमेत स्पष्ट न दिसणारे बारकावे प्रतिकृतीत अचूक दाखवता येत नाहीत. या तंत्रज्ञानाला संशोधनाचाही आधार आहे. २०२० मध्ये ‘जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक, गायनॅकॉलॉजिक अँड निओनेटल नर्सिंग’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात ९६ गर्भवती महिलांचा समावेश होता. यात केवळ सोनोग्राफीच्या प्रतिमा पाहणाऱ्या महिलांच्या तुलनेत बाळाची थ्रीडी प्रतिकृती मिळालेल्या महिलांत आई आणि गर्भातील बाळ यांच्यातील भावनिक नात्याची जाणीव अधिक वाढल्याचे दिसून आले. थ्रीडी प्रतिकृती मिळालेल्या गटात ही वाढ सरासरी ८.७ टक्के, तर केवळ सोनोग्राफी प्रतिमा पाहिलेल्या गटात ४.९ टक्के होती. ही संकल्पना रेडिओलॉजिस्ट डॉ. आनंद भेरवानी, डॉ. संदेश रोठे आणि डॉ. शीतल काबरा यांची आहे.

वैद्यकीय खबरदारी महत्त्वाची
या सेवेसाठी केवळ वैद्यकीय कारणांसाठी आधीच करण्यात आलेल्या सोनोग्राफीच्या प्रतिमांचा वापर केला जाणार आहे. केवळ प्रतिकृती तयार करण्यासाठी अतिरिक्त सोनोग्राफी करण्याची शिफारस केली जाणार नाही. ही सेवा देशभरातील रुग्णालये आणि सोनोग्राफी केंद्रांमार्फत उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.