

कल्याण, ता. १८ (वार्ताहर) : मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासन आक्रमक झाले आहे. कराचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात आता कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. थकबाकीदारांना जप्ती वॉरंटपूर्व सूचना पाठविण्यात आल्या असून, निर्धारित मुदतीत कराचा भरणा न केल्यास नळजोडणी खंडित करणे, मालमत्तेवर अटकावणी आणणे, जप्ती करणे आणि अखेर मालमत्तेचा लिलाव करण्याची कारवाई केली जाणार आहे.
महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेत थकबाकीदारांना तातडीने कर भरण्याचे आवाहन केले आहे. मालमत्ता कर वेळेत न भरल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार देय रकमेवर दरमहा दोन टक्के दंडात्मक व्याज आकारले जाते. त्यामुळे कराची थकबाकी वाढत जाण्याआधीच नागरिकांनी आपली देय रक्कम भरावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, थकबाकीदारांवर केवळ नोटिसांपुरती कारवाई मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष वसुलीची मोहीम राबविण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांविरोधात टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार मालमत्ता जप्त करून तिच्या लिलावाची प्रक्रियाही राबविण्यात येणार आहे. या कारवाईबाबत व्यापक प्रसिद्धी देण्याचेही महानगरपालिकेने ठरविले आहे.
प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने सवलतींची योजनाही जाहीर केली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर एकरकमी भरल्यास कराच्या रकमेवर चार टक्के सवलत मिळणार आहे. त्याचबरोबर ऑनलाइन पद्धतीने कर भरल्यास आणखी दोन टक्के अतिरिक्त सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे एकूण सहा टक्क्यांपर्यंत सवलतीचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.