

आयसीआयसीआय-व्हिडिओकॉन बँक कर्ज प्रकरण :
चंदा कोचरबाबत
खटल्याची मंजुरी रद्द
मुंबई,ता. १८ : आयसीआयसीआय-व्हिडिओकॉन बँक कर्जप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्यावरील खटला चालवण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने दिलेली मंजुरी उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. १८) रद्द केली. ही मंजुरी बेकायदा होती आणि ती रद्द होण्यास पात्र असल्याचे निरीक्षण न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने कोचर यांना दिलासा देताना नोंदवले. बँकेच्या संचालक मंडळाने, १५ मे २०२३ मध्ये कोचर यांच्यावर खटला चालवण्यासाठी परवानगी दिली होती.
बँकेचे संचालक मंडळ अशी मंजुरी देण्यासाठीचे सक्षम प्राधिकरण नव्हते. मंजुरी देताना संचालक मंडळासमोर ठेवलेल्या पुराव्यांचा किंवा त्यातील अभावाचा त्यांनी अजिबात विचार केला नाही. त्यामुळे या प्रकरणात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता असल्याचेही न्यायालयाने ही मंजुरी बेकायदा ठरवून रद्द करताना स्पष्ट केले. बँकेने मंजुरी देताना योग्य प्रक्रियेचे पालन केले नसल्याचा चंदा कोचर यांचा युक्तिवादही न्यायालयाने मान्य केला.
कोचर यांच्या याचिकेनुसार त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने २२ एप्रिल २०२३ मध्ये एक ठराव मंजूर केला होता. त्याची माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जून २०२३ मध्ये विशेष सत्र न्यायालयाला दिली होती. बँकेने ही मंजुरी देण्यासाठी योग्य प्रक्रियेचे पालन केले नाही आणि बँकेचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावाही कोचर यांच्याकडून करण्यात आला होता.