

परदेशी नोकरीचे प्रलोभन दाखवून सहा तरुणांना उझबेकिस्तानात वेठबिगारी
१० लाखांची फसवणूक; पगाराचे ६,६०० डॉलरही हडपले
नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) : उलवे परिसरात एका टोळीने परदेशात चांगल्या नोकरीचे प्रलोभन दाखवून सहा बेरोजगार तरुणांची १० लाख सहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी तरुणांना टुरिस्ट व्हिसावर उझबेकिस्तान येथे पाठवून बांधकाम साईटवर मजुरीची कामे करून घेतली, त्यांना डांबून ठेवले आणि त्यांच्या पगाराचे पैसेही परस्पर लाटले. याप्रकरणी उलवे पोलिसांनी टोळीविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केले असून तपास सुरू केला आहे.
संजीतकुमार सिंह, विजय सिंह, लालचंद राजू, एजंट रामसजन यादव ऊर्फ बबलू यादव या चौघांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या आरोपींनी वर्षभरापूर्वी उलवे येथील खारकोपर रेल्वे स्थानकाजवळील सद्भावना सोसायटीत एस. एम. प्लेसमेंट एलएलपी व महाकाल मरीन रिक्वायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कार्यालय थाटले होते. त्यानंतर या आरोपींनी परदेशात चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देण्याची जाहिरातबाजी केली. या जाहिरातबाजीला बळी पडून तसेच एजंटच्या माध्यमातून उत्तर प्रदेशसह इतर भागातील अनेक बेरोजगार तरुणांनी या कार्यालयात संपर्क साधला.
डॉलर्स प्रलोभन
आरोपींनी दरमहा ५५० डॉलर्स पगार आणि दोन वर्षांच्या वर्क परमिटचे प्रलोभन दाखवून प्रत्येकाकडून एक लाख २० हजार रुपये उकळले. त्यानंतर आरोपींनी १६ डिसेंबर २०२५ रोजी सहा तरुणांना कझाकिस्तानमार्गे उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे पाठविले; मात्र तिथे त्यांना कंपनीऐवजी एका इमारतीच्या बांधकाम साईटवर नेऊन सोडण्यात आले. त्याठिकाणी दोन महिने वेठबिगारीसारखे काम केल्यानंतर त्यांच्या कामाचा मोबदला सहा हजार ६०० डॉलर्सची रक्कम विजय सिंहने परस्पर लाटल्याचे उघडकीस आले.
हलाखीची स्थिती
अखेर या तरुणांनी भारतात परत जाण्याची याचना केली; मात्र पैसे नसल्याने त्यांना परतीच्या विमानाचे तिकीट काढण्यासाठी सलग १५ दिवस अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मजुरीची कामे करण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर पाच तरुण कसेबसे भारतात परतले; मात्र स्वपन सरकार हा तरुण अद्यापही उझबेकिस्तानमध्ये अडकून पडला असून व्हिसा संपल्याने त्याचे खाण्या-पिण्याचे अतोनात हाल होत आहेत. भारतात परतल्यानंतर फसवणूक झालेल्या तरुणांनी उलवे येथील आरोपींच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून हाकलून लावले. अखेर या पीडित तरुणांनी उलवे पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.