हाऊसकीपिंग साहित्याच्या पुरवठÎाच्या बहाण्याने व्यावसायीकाला 10 लाखांचा गंडा; सानपाडा पोलिसांकडुन त्रिकुटाचा शोध सुरु

हाऊसकीपिंग साहित्याच्या पुरवठÎाच्या बहाण्याने व्यावसायीकाला 10 लाखांचा गंडा;   सानपाडा पोलिसांकडुन त्रिकुटाचा शोध सुरु
Published on

हाउसकीपिंग साहित्याच्या पुरवठ्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याला १० लाखांचा गंडा
नवी मुंबई, ता. ३१ (वार्ताहर) : हाउसकीपिंग साहित्याची मोठी व्यावसायिक ऑर्डर देण्याचे प्रलोभन दाखवून एका टोळीने सानपाडा येथील व्यापाऱ्याला तब्बल १० लाख १६ हजार ६६० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महेश पटेल, रमेश पटेल आणि कौशिक अशी या आरोपींची नावे असून, सानपाडा पोलिसांनी त्यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार विजेश शाहा हे कांदिवली येथे राहण्यास असून, त्यांचे सानपाडा सेक्टर-१८ येथील क्लीन टेक नावाच्या हाउसकीपिंग उत्पादनांचे कार्यालय आहे. काही दिवसापूर्वी त्यांच्या सेल्स प्रतिनिधीची ओळख भिवंडी (काल्हेर) येथील ध्रुवी एंटरप्रायझेस दुकानात बसणाऱ्या कौशिक नावाच्या तरुणाशी झाली होती. कौशिकने त्याचे मालक महेश पटेल हे मोठी ऑर्डर देऊ शकतात, असे सांगितले.
त्यानंतर महेशने ध्रुवी एंटरप्रायझेसचा मालक असल्याचे भासवून शाहा यांच्याशी संपर्क साधला. उत्पादनांचा दर्जा तपासण्यासाठी त्याने सुरुवातीला शाहा यांना ४५ हजार ७४८ रुपयांची लहान ऑर्डर दिली. तसेच माल भिवंडीच्या गोदामात उतरवून घेतला आणि त्याचे पैसेही अदा केले. माल चांगला असल्याचे सांगत महेश पटेल याने टी. टी. एंटरप्रायझेस ही मोठी कंपनी असल्याचे भासवून त्याचे मालक रमेश पटेल आणि तो असे दोघे सोबत असल्याचे सांगून १० लाख १६ हजार ६६० रुपयांची मोठी ऑर्डर दिली.
शाहा यांनी एप्रिल २०२६ दरम्यान चार टप्प्यांत हा सर्व माल भिवंडी, काल्हेर येथील गोदामात वितरित केला. प्रत्येक वेळी कौशिकने मालाची पाहणी करून डिलिव्हरी नोटवर स्वाक्षरी केली. मोबदल्यात आरोपींनी तक्रारदाराला बेसिन कॅथॉलिक को-ऑपरेटिव्ह बँकेचे एकूण १० लाख १६ हजार ६६० रुपयांचे तीन पोस्ट-डेटेड धनादेश दिले. तक्रारदारांनी मे २०२६ मध्ये हे धनादेश बँकेत वटवण्यासाठी जमा केले, पण ते वटले नाहीत. त्यानंतर सेल्स प्रतिनिधीने गोदामात प्रत्यक्ष जाऊन पाहिले असता दोन्ही वेअरहाउस पूर्णपणे रिकामी करून आरोपी फरार झाल्याचे आणि त्यांचे मोबाईल क्रमांकही बंद असल्याचे आढळले. त्यानंतर शाहा यांनी आरोपींनी दिलेल्या इनव्हॉइसवरील जीएसटी क्रमांकाची तपासणी केली असता ध्रुवी एंटरप्रायझेसचे नोंदणीकृत मालक हरीलाल धर्मशी चौधरी असल्याचे, तर टी. टी. एंटरप्रायझेसचे नोंदणीकृत मालक एकनाथ आप्पा कांबळे असल्याचे निष्पन्न झाले. तसेच धनादेशावर विक्रांत नावाच्या तिसऱ्याच व्यक्तीची स्वाक्षरी असल्याचे आढळून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com