

वरिष्ठांच्या त्रासामुळे आत्महत्या?
पोलिस उपनिरीक्षकाच्या कुटुंबीयांचा आरोप
नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : पोलिस दलातील अंतर्गत ताणतणाव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कथित त्रासाला कंटाळून नवी मुंबई पोलिस दलातील विशेष शाखेत कार्यरत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) पांडुरंग निंबा पाटील (वय ५६) यांनी आत्महत्या केल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पुराव्यांच्या आधारे कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी ठिय्या आंदोलन मागे घेत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्यात घेतला.
पाटील यांनी शनिवारी (ता. ५) सायंकाळी महापे येथील साची लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते. एका व्हिडिओमध्ये त्यांनी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे न्यायाची मागणी करीत एका माजी पोलिस उपायुक्त, एका सहाय्यक पोलिस आयुक्त आणि एका वरिष्ठ लिपिकाकडून त्रास होत असल्याचा आरोप केला आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांनी कुटुंबीयांची माफी मागितली आहे.
दरम्यान, पाटील यांच्या पाकिटात सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या कारच्या डिकीतून आठ पानी सुसाईड नोट जप्त केली असून ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. या पत्रातील मजकुराबाबत पोलिस प्रशासनाकडून कसून पडताळणी सुरू आहे. पाटील यांची मुलगी वैष्णवी हिने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. वडिलांना वारंवार बदल्यांची धमकी दिली जात होती, तसेच त्यांच्यावर पैसे गोळा करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोपही तिने केला.
..
ठिय्या आंदोलन
दोषींवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा पाटील कुटुंबीयांनी घेत रविवारी रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर ठाणे-बेलापूर मार्गावर रस्ता रोकोही करण्यात आला. अखेर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करून पुराव्यांच्या आधारे कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.