

मिनी सीशोरवर ‘धुक्याऐवजी’ प्रदूषणाचा विळखा!
पहाटे व्यायामाला आलेले नागरिकच प्रदूषित हवेत; ‘हेल्दी सिटी’च्या दाव्यावर प्रश्नचिन्ह
नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : आरोग्य सुधारण्यासाठी पहाटेच्या वेळी घराबाहेर पडलेल्या वाशी येथील नागरिकांना आज (शुक्रवारी) एका भीषण वास्तवाचा सामना करावा लागला. येथील प्रसिद्ध मिनी सीशोर परिसरात पहाटे दाट धुके नसून विषारी वायूचे प्रदूषण पसरल्याचे उघडकीस आले. पहाटेपासूनच चालणे, धावणे, व्यायाम आणि योगासनांसाठी जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांना या प्रदूषित हवेत श्वास घ्यावा लागला. यातून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, परिसरात तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
मॉर्निंग वॉकसाठी येणारे नितीन कांबळे म्हणाले, की मी गेल्या अनेक वर्षांपासून नियमितपणे मॉर्निंग वॉकसाठी मिनी सीशोरवर येतो. सकाळची स्वच्छ हवा आणि मोकळे वातावरण मिळते, म्हणून अनेक नागरिक या ठिकाणी येतात. मात्र आज धुक्यासारखे दिसणारे वातावरण प्रत्यक्षात प्रदूषणाचे असल्याचे जाणवले आणि काळजी वाटली. आरोग्य चांगले राहावे म्हणून घराबाहेर पडायचे आणि प्रदूषित हवा श्वासातून घ्यायची, अशी परिस्थिती असेल तर आम्ही व्यायामासाठी जायचे कुठे, असा प्रश्न उपस्थित करीत महापालिकेने याबाबत तातडीने दखल घेऊन हवेची गुणवत्ता तपासावी आणि प्रदूषणाचे कारण शोधून कायमस्वरूपी उपाय करावेत, असे कांबळे यांनी सांगितले.
नवी मुंबईत सुरू असलेली मोठ्या प्रमाणावरील बांधकामे, रस्त्यांवरील धूळ, वाढती वाहनांची संख्या, वाहतुकीची कोंडी आणि विविध विकासकामांमधून निर्माण होणारे धूलिकण याचा परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिनी सीशोर परिसरातील अशा स्थितीचे प्रशासनाने गांभीर्याने परीक्षण करण्याची गरज आहे. तसेच मिनी सीशोर परिसरात कायमस्वरूपी हवा गुणवत्ता मापक यंत्र बसविण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे अन्य प्रमुख प्रदूषकांचे प्रमाण नागरिकांना प्रत्यक्ष पाहता यावे, यासाठी डिजिटल डिस्प्ले लावावा. हवा गुणवत्ता धोकादायक पातळीवर असल्यास नागरिकांना व्यायाम टाळण्याबाबत सूचना देण्याची व्यवस्था करावी.
- बी. एन. कुमार, संचालक, नॅटकनेक्ट फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.