

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिस सज्ज
यंदा आयुक्तालयात एक मंडळ-एक पोलिस अंमलदार तैनात राहणार
नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : गणेशोत्सव निर्विघ्न, सुरक्षित व आनंदात साजरा व्हावा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नवी मुंबई पोलिस दल सज्ज झाले आहे. आयुक्तालयाच्या वतीने शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, यंदाच्या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ‘एक मंडळ-एक पोलिस अंमलदार’ ही विशेष योजना राबविण्यात येत आहे. गणेशभक्तांनीदेखील नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
यावर्षी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एक हजार सार्वजनिक (४८९ सार्वजनिक व ५३४ सोसायटी) तसेच एक लाख ३३३ खासगी असे एकूण एक लाख एक हजार ३५६ गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. वाशी परिमंडळ-१ मध्ये ३८९ सार्वजनिक, २६ हजार ४८२ खासगी अशा एकूण २६ हजार ८७१ गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. बेलापूर परिमंडळ-२ मध्ये २०७ सार्वजनिक, २७ हजार २५८ खासगी असे २७ हजार ४६५ तर पनवेल परिमंडळ-३ मध्ये ४२७ सार्वजनिक व ४६ हजार ५९३ असे एकूण ४७ हजार ०२० गणपतींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्याचप्रमाणे एकूण सहा हजार ३५१ गौरी विराजमान होणार आहेत.
समाजकंटकांवर वॉच ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे
समाजकंटकांवर व समाजविघातक व्यक्तींवर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांनी सर्व गणेशमूर्ती विसर्जन घाटावर पोलिस आणि महापालिकेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार आहेत. त्याशिवाय गणेश विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठीदेखील विशेष कॅमेऱ्यांची व्यवस्था केली आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
गणेशोत्सव काळात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी नवी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यासाठी सात पोलिस उपायुक्त, १३ सहाय्यक पोलिस आयुक्त, ७० पोलिस निरीक्षक, २३५ सहाय्यक पोलिस निरीक्षक-पोलिस उपनिरीक्षक, तसेच २,१२८ पोलिस अंमलदार तैनात ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय २० स्ट्रायकिंग फोर्स, क्युआरटी-२ फ्लाटून, आरसीपी-२ फ्लाटून, तसेच २०० होमगार्ड, १४८ ट्राफिक वॉर्डन, ३० एमएसएफ अमंलदार असा बंदोबस्त तैनात ठेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे प्रशिक्षित बॉम्ब शोधक व नाशक पथकदेखील तैनात ठेवण्यात येणार आहे.
ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी विशेष पथक
ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी गणेशोत्सवात डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पोलिस ठाण्यात ध्वनिप्रदूषण विरोधी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना ध्वनिमापक यंत्रे हाताळण्याबाबतचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले असून, यासंदर्भात कारवाई करण्याच्या पद्धती (एसओपी) याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव-२०२६ निर्विघ्नपणे व आनंदात साजरा व्हावा तसेच गणेशोत्सव काळात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवला आहे. गणेशभक्तांनीदेखील गणेशोत्सव साजरा करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करुन शांततेत गणेशोत्सव साजरा करावा. नागरिकांना काही संशयास्पद आढळल्यास त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
- योगेश चव्हाण, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा, नवी मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.