

गणेशोत्सवात महिलांच्या दागिन्यांवर लुटारूंची नजर
नवी मुंबई-पनवेलमध्ये अवघ्या काही दिवसांत मंगळसूत्र-चेन लुटण्याच्या चार घटना
नवी मुंबई (वार्ताहर) ः गणेशोत्सवाच्या काळात आणि गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या दागिन्यांना चोरट्यांनी आपले लक्ष्य केले आहे. नवी मुंबई आणि पनवेल परिसर क्षेत्रात अवघ्या काही दिवसांत मंगळसूत्र आणि सोनसाखळ्या पळवण्याच्या तब्बल चार वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. या चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण १४ लाख ४० हजार रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज लंपास केला असून, या प्रकारांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पनवेलच्या साईनगर परिसरात शुक्रवारी (ता. १८) रात्री उज्ज्वला पाटील (४३) या मुलीसह घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील चार लाख ९० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पलायन केले. पनवेल शहर पोलिसांनी या चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे, तर सीवूड्समध्ये शुक्रवारी रात्री गौरी-गणपतीचे दर्शन घेऊन मुलीसह घरी परतणाऱ्या स्मिता घाग यांनाही चोरट्यांनी लक्ष्य करत त्यांच्या गळ्यातील तब्बल सहा लाख ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी एनआरआय पोलिसांकडून या लुटारूंचा शोध घेण्यात येत आहे. घणसोलीतील ६० वर्षीय सुप्रिया जाधव यांनाही पाम बीच रोडवरील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी जात असताना लक्ष्य करण्यात आले. त्यांचे एक लाख ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी खेचून पलायन केले. याप्रकरणी रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, उरणच्या जासई येथे पोलिस असल्याची बतावणी करून ६५ वर्षीय चंद्राबाई म्हात्रे यांची एक लाख ७० हजार रुपयांची सोन्याची चेन लुबाडून नेली आहे. पुढे कडक चेकिंग सुरू आहे, असे सांगून त्यांना चेन काढण्यास भाग पाडले व आरोपींनी हातचलाखीने दागिने लांबवले आहेत. उरण पोलिसांनी या आरोपींचा शोध सुरू केला आहे.
दर्शनाला जाताना महिलांनी सावध राहण्याचे आवाहन
गणेशोत्सवात मंदिरांमध्ये दर्शनासाठी तसेच नातेवाइकांकडे जाणाऱ्या महिलांची वर्दळ वाढली आहे. गर्दी, रात्रीची वेळ आणि पायी प्रवास करणाऱ्या महिलांवर पाळत ठेवून चोरटे संधी साधत असल्याचे या घटनांवरुन दिसून येत आहे. या चारही प्रकरणांमध्ये संबंधित पोलिस ठाण्याकडून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक तपासाच्या आधारे तपास केला जात आहे. महिलांनी शक्यतो निर्जन रस्त्यांवरुन दागिने झाकून ठेवावेत, तसेच संशयास्पद व्यक्ती किंवा वाहन आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.